अभिनेत्रीकडून छळाचा आरोप
वृत्तसंस्था/ कोची
प्रसिद्ध मल्याळी चित्रपट निर्माता सनल कुमार शशिधरनवर एका प्रसिद्ध अभिनेत्रीला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्रास दिल्याचा आरोप झाला आहे. याप्रकरणी त्याच्या विरोधात एफआयआर नोंद झाल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.
कथितपणे पाठलाग करणे, गुन्ह्याची धमकी आणि मानहानीसाठी बीएनएसच्या विविध कलमांच्या अंतर्गत ‘कयाट्टम’च्या दिग्दर्शकाच्या विरोधात एलमक्कारा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. अभिनेत्रीने सोमवारी शशिधरनच्या विरोधात तक्रार नोंदविली होती. अभिनेत्री आणि तिच्या मुलीच्या जीवाला धोका असल्याचा दावा शशिधरनने एका फेसबुक पोस्टद्वारे केला होता. तर संबंधित एफआयआर अभिनेत्रीच्या नावावर अन्य कुणी व्यक्तीने केलेल्या तक्रारीवर नोंदविण्यात आल्याचा दावाही शशिधरनने केला आहे.
शशिधरनला मे 2022 मध्ये संबंधित अभिनेत्रीच्या तक्रारीच्या आधारावर अटक करण्यात आली होती. शशिधरनने अभिनेत्रीला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे ब्लॅकमेल करत तिच्या प्रतिष्ठेला नुकसान पोहोचविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. याप्रकरणी शशिधरनची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती.









