वृत्तसंस्था/ रांची
साहिबगंज अवैध खाण प्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सीबीआय, ईडीकडून याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आल्यावर आता याप्रकरणी आणखी एक एफआयआर नोंदविण्यात आला आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा एफआयआर तीर्थनाथ आकाश आणि अनुरंजन अशोक यांच्याकडून नोंदविण्यात आला आहे. तीर्थनाथ आकाश हे पर्यावरण कार्यकर्ते तर अनुरंजन हे याचिकाकर्ते आहेत. या दोघांनीही साहिबगंजमध्ये अवैध खाणकाम सुरू असल्याचे पुरावे समोर आणले होते.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन, त्यांचे माध्यम सल्लागार अभिषेक प्रसाद पिंटू यांच्यासह 20 जणांवर एफआयआर नेंदविण्यात आला आहे. झारखंड पोलिसांनी ऑनलाइन एफआयआर सिस्टीमच्या माध्यमातून हे प्रकरण नोंदविले आहे. आता याप्रकरणी चौकशी सुरू होणार आहे.
साहिबगंज येथील अवैध खाणकामासंबंधी तीर्थनाथ आकाश आणि अनुरंजन अशोक यांनी झारखंड उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने दोन्ही याचिकाकर्त्यांना साहिबगंज पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्याचा आदेश दिला होता. साहिबगंजमध्ये झालेल्या अवैध खाणकामाप्रकरणी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ईडीकडून यापूर्वीही चौकशी झाली आहे.









