विमानतळ एटीसीत बळजबरीने घुसल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ देवघर
झारखंडच्या देवघर विमानतळाच्या एअर ट्रफिक कंट्रोलर (एटीसी)वर दबाव टाकून रात्री चार्टर्ड विमान टेकऑफ करविण्याप्रकरणी भाजप नेत्यांच्या विरोधात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. या नेत्यांमध्ये गोड्डा येथील भाजप खासदार निशिकांत दुबे, त्यांचे दोन्ही पुत्र, खासदार मनोज तिवारी अन् भाजप नेते कपिल मिश्रा यांचा समावेश आहे.
देवघर विमानतळावर तैनात पोलीस उपअधीक्षक सुमन अमन यांनी त्यांच्या विरोधात तक्रार नोंदविली आहे. 31 ऑगस्ट रोजी भाजप नेत्यांनी विमानतळाच्या एटीसीमध्ये घसून कर्मचाऱयांवर बळजबरीने मंजुरी देण्यास भाग पाडले आहे. देवघर विमानतळावर नाइट टेकऑफ आणि लँडिंगची सुविधा देखील नसल्याचे या तक्रारीत म्हटले गेले आहे.
एटीसी कंट्रोल रुममध्ये या घटनेवेळी विमानतळाचे संचालक तसेच चार्टर्ड विमानाचे वैमानिक उपस्थित होते. वैमानिकाने एटीसी कर्मचाऱयांवर दबाव टाकून मंजुरी मिळविण्याचा प्रयत्न चालविला होता. काही वेळाने खासदार अन् त्यांचे दोन्ही पुत्र तेथे पोहोचले. दबावामुळे विमानाच्या टेकऑफला मंजुरी मिळाल्याचे पोलीस उपअधीक्षकांनी तक्रारीत नमूद पेले आहे.
याप्रकरणी खासदार निशिकांत दुबे यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर निशाणा साधला आहे. पीडित कुटुंबाला भेटायला गेल्याने सोरेन हे बिथरले असून त्यांनी खरेदी केलेल्या व्यवस्थेद्वारे आम्हाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न चालविला आहे. झारखंडमधील धर्मांधांमुळे त्रस्त कुटुंबाच्या न्यायालयाची लढाई बंद पडू देणार नसल्याचे दुबे म्हणाले.
पीडित कुटुंबाची घेतली भेट
31 ऑगस्ट रोजी खासदार दुबे, खासदार मनोज तिवारी आणि कपिल मिश्रा हे देवघरमधील दुमका येथे पोहोचले होते. पेट्रोल अटॅकमध्ये मारली गेलेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाची त्यांनी भेट घेतली आहे. या मुलीला तिच्या शेजारीच राहणाऱया शाहरुखने घरातच पेट्रोल ओतून जाळले होते.









