अवजड वाहनांच्या लेनमधून जात होती वाहने
वास्को : झुआरी नदीवरील नवीन आठ पदरी पुलावर अवजड वाहनांसाठीच राखीव असलेल्या रस्त्यावरून दुचाकी, तीन चाकी व चारचाकी वाहनांचीही वर्दळ वाढल्याने वाहतूक पोलिसांनी काल मंगळवारी धडक कारवाईत एकूण 144 चालकांना दंड दिला. त्याशिवाय एकूण 130 वाहनांचे फोटो घेण्यात आलेले असून त्यांनाही चलान देण्यात येणार आहे. राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन होऊ लागल्याने कारवाई हाती घेण्यात आलेली असून ही मोहीम चालूच राहणार असल्याचे वाहतूक पोलीस अधीक्षक बॉसुएट सिल्वा यांनी सांगितले. झुआरी नदीवरील पहिला चौपदरी पूल डिसेंबरच्या अखेरीस वाहतुकीस खुला झाला आहे. त्याचवेळी या पुलावरील एक रस्ता मडगावच्या दिशेने जाण्यासाठी केवळ अवजड वाहतुकीकरीता राखीव ठेवण्यात आला होता. मात्र, या रस्त्यावर अवजड वाहतुकीबरोबरच चारचाकी, दुचाकी व तीनचाकी वाहनांचीही गर्दी वाढली आहे. हल्ली या प्रकारात बरीच वाढ झाली आहे. बरेच वाहनचालक नकळतपणे या रस्त्याने वाहतूक करीत होते तर काहींना चूक माहीत असूनही ते या रस्त्याचा वापर करीत होते. वाहतूक पोलिसांचा संदेश किंवा पुलाच्या प्रवेश मार्गावर लावलेल्या संदेश फलकाकडेही दुर्लक्ष करण्यात येत होते. हा प्रकार नियमभंग करणारा आणि धोकादायकही होता. अशाच प्रकारातून एक पोलीस मंगळवारी सकाळी वाहनाच्या धडकेपासून वाचला.
एटीएसच्या वाहनचालकाकडूनही दंड वसूल
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर वाहन चालकांना दंड देण्याची धडक मोहीम सुरू झाली. या कारवाईत एटीएस पोलिसांचे वाहनही सापडले. त्यांच्याकडूनही दंड वसूल करण्यात आला.
एकूण 274 चालकांविरूद्ध कारवाई
पोलीस अधीक्षक बॉसुएट सिल्वा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेकर व इतर पोलिसांनी ही कारवाई केली. या पुलावर नियम मोडणाऱ्या मोठ्या संख्येने वाहने रोखण्यात आली. त्यांना त्यांच्या चुकीविषयी माहिती देण्यात आली आणि दंडही देण्यात आला. दुपारपर्यत 144 चालकांकडून प्रत्येकी पाचशे ऊपये दंड वसूल करण्यात आला. ज्या वाहनचालकांना जाण्याची घाई होती, त्यांचे नुकसान होई नये म्हणून त्यांच्या वाहनांचे फोटो काढून त्यांना सोडण्यात आले. त्यांना दंडाचे चलान पोहोचते करण्यात येणार आहे. एकूण 274 चालकांविरूद्ध कारवाई करण्यात आली.
कारवाईमुळे वाहन चालकांना धक्का
या धडक कारवाईची कोणी कल्पना केली नव्हती. त्यामुळे नियम मोडून भरधाव येणाऱ्या वाहनचालकांना कारवाईचा धक्काच बसला. काहींनी वादही घालण्यास सुरूवात केली. पुलावर सोयीस्कर दिशादर्शक फलक नाही. आहे ते फलक कुणाला दिसत नाहीत, अशा तक्रारी काहींनी केल्या. वाहनचालक चुकून या रस्त्याने येत असतात, किमान एकदा त्यांना माफ करावे अशीही मागणी वाहनचालक करीत होते. मात्र, पोलिसांची कारवाई चालूच राहिली. वाहनचालकांना दंड देण्याच्या या कारवाईमुळे या पुलावर बराच वेळ इतर वाहनेही अडकून पडली.
कारवाई सुरूच राहणार
अवजड वाहनांसाठी राखीव असलेल्या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांविरूद्ध कारवाई चालूच राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक बॉसुएट सिल्वा यांनी म्हटले आहे.









