खानापूर नगरपंचायतीचा निर्णय-घाटावर कर्मचारी नियुक्त : नदीपात्र स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करण्याचे आवाहन
खानापूर : मलप्रभा नदीचे महात्म्य पुराणात तसेच गुरुचरित्रात उल्लेख केलेले आहे. तसेच रेणुकादेवी चरित्रग्रंथातही मलप्रभा नदीचा उल्लेख आहे. यामुळे मलप्रभा नदीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. दर आमावस्या, पौर्णिमा यासह मंगळवार, शुक्रवार, मकरसंक्रांत, शिवरात्री यासह इतर सणानिमित्त मलप्रभा नदीवर स्नानासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते. मात्र अलीकडे मलप्रभेचे पात्र पूर्णपणे दूषित झाले आहे. यासाठी नगरपंचायतीने याबाबत आता क्रम घेतलेला आहे. मात्र जोपर्यंत शहरातील सांडपाण्याचे नियोजन होणार नाही तोपर्यंत मलप्रभेचे पात्र दूषितच राहणार आहे. यासाठी नगरपंचायतीने वेगळे नियोजन करणे गरजेचे आहे.
अस्थीविसर्जन न करण्याचे आवाहन
नगर पंचायतीकडून घाटाच्या ठिकाणी अस्थीविसर्जन तसेच इतर नैर्माल्य टाकण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. यासाठी या ठिकाणी एका कर्मचाऱ्याचीही नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच घाटावर ध्वनिक्षेपकाद्वारे कचरा, नैर्माल्य आणि अस्थीविसर्जन करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. याबाबत बोलताना नगराध्यक्षा मिनाक्षी बैलूरकर म्हणाल्या, शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पाणी अडवण्यात आलेले आहे. याच ठिकाणी बाहेरुन येणारे नागरिक अस्थीविसर्जन तसेच निर्माल्य आणि देवदेवतांचे फोटो नदीपात्रात सोडत आहेत. त्यामुळे अडवलेले पाणी दूषित होत आहे. यावर कडक निर्बंध घालण्यात आले असून कोणीही अस्थीविसर्जन तसेच नैर्माल्य नदीत सोडताना आढळल्यास 2000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांनी मलप्रभेचे पात्र स्वच्छ राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षांनी केले आहे.
नदीपात्रातील पाणी दूषित
नुकतेच महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी मलप्रभा नदीघाटावर स्नान तसेच धार्मिक विधी, पूजापाठ केलेले आहेत. बाहेरील नागरिकांनी या पात्रात स्नान केले आहे. मात्र पाणी अडवलेले असून या पाण्यात शहरातील सांडपाणी मिसळत आहे. त्यामुळे मलप्रभा नदीपात्रातील पाणी दूषित झाले आहे. भाविकांनी या पाण्यात स्नान केल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका आहे.









