नागसर्प किंवा किंग कोब्रा हा सर्वात विषारी साप असल्याची आतापर्यंतची समजूत आहे. मात्र ती खोटी ठरेल, अशी स्थिती आहे. ऑस्ट्रेलियात सापडणारा ‘इनलँड तैपिन’ नामक साप नागसर्पापेक्षाही विषारी असल्याचे दिसून आले आहे. त्याच्या एक ग्रॅम विषाने 100 माणसे किंवा 2 लाख 50 हजार उंदीर मृत्यूमुखी पडू शकतात. आतापर्यंत साधारणतः 600 प्रजातींचे साप विषारी असतात असे आढळून आले असून त्यापैकी 200 प्रजाती माणसांसाठी घातक ठरु शकतात. त्यांच्यात हा साप पहिल्या क्रमांकावर आहे. हा शोध तसा नवा नव्हे. तो अनेक वर्षांपूर्वीच लागला आहे. तथापि, आता या सापावर नव्याने संशोधन होत आहे.

सापाच्या विषाची तीव्रता एलडी 50 या निकषावर गणली जाते. ब्रिस्टॉल विद्यापीठाच्या स्कूल ऑफ केमिस्ट्री या वेबसाईटवर या सापाची आणि सापाच्या विषांची माहिती मिळते. इनलँड तैपिन हा साप सर्वात विषारी असल्याचे या वेबसाईटवर नमूद करण्यात आले आहे. या विषावर सध्या विविध प्रयोग चालले आहेत. माणसाची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी काही औषधे या सापाच्या विषापासून तयार करता येतील का, याची पडताळणी केली जात आहे. सापाचे विष कोणकोणत्या व्याधींवर उपयोगी पडू शकेल हे माहीत करुन घेण्याचा संशोधकांचा प्रयत्न आहे. त्यामुळे हा साप पुन्हा चर्चेचा विषय झाला आहे.









