युवती सुंदर आणि संस्कारी असेल, तर तिच्यासाठी मुलांच्या रांगा लागतात’ अशा अर्थाचा एक वाक्प्रचार आहे. पण अशा सर्वच युवतींच्या संदर्भात असे घडते असे नाही. कारण ‘विवाहाच्या गाठी या स्वर्गात मारलेल्या असतात’, असाही वाक्प्रचार आहेच. एकंदर, विवाह ही पुष्कळशी भाग्याच्या हाती असणारी बाब आहे.
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतात राहणारी 34 वर्षीय युवती ईव्ह टिली-कॉक्सन हिच्या संदर्भात नेमके हेच घडत आहे. ती वकील आहे. स्वत:च्या पायावर उभी आहे. तसेच दिसायला सुंदर आणि सभ्यही आहे. तथापि, काही ना काही कारणास्तव तिचे लग्न काही जमत नाही, अशी स्थिती आहे. तिला लग्नाची तहान इतकी लागली आहे, की आता तिला ते केल्याशिवाय स्वस्थ बसवेनासे झाले आहे. म्हणून तिने चक्क जाहीरात देऊन एक प्रस्ताव लोकांसमोर मांडला आहे. तो असा, की जी व्यक्ती तिच्यासाठी तिला मान्य होईल असा नवरा शोधेल त्याला ती चार लाख रुपये देणार आहे. या युवतीचे टिकटॉकवर 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिने सोशल मिडियावर हा प्रस्ताव प्रसिद्ध केला आहे.
अर्थातच. तिच्या अनेक अटी आहेत. होणारा नवरा तिला अनुरुप हवा. मात्र, ती त्याच्याशी दीर्घकाळपर्यंत विवाह बंधनात राहणार नाही. विवाह झाल्यानंतर 20 वर्षांनी ती त्याला घटस्फोट देण्यास तयार आहे. त्याचे वय 27 वर्षे ते 40 वर्षे इतके असावयास हवे. त्याला संवाद साधण्याची कला उत्तम रितीने अवगत असावयास हवी. तो क्रिडापटू किंवा क्रिडाप्रेमी असावयास हवा. त्याची उंची किमान सहा फूट तरी हवीच हवी. तसेच त्याला उत्कृष्ट विनोदबुद्धी असावयास हवी. त्याला लांबच्या प्रवासाची आवड हवी. तिने तिच्या या अटी प्रसिद्ध केल्यावर त्या लक्षावधी लोकांनी पाहिल्या आहेत. तिच्याशी 25 हून अधिक लोकांनी संपर्कही केला आहे. पण तिने त्यांच्यापैकी एकालाही पसंत केलेले नाही. आतापर्यंत मी एकालाही ‘डेट’ केलेले नाही, असेही तिचे प्रतिपादन आहे. तेव्हा तिच्या अटी पूर्ण करु शकतील, अशांसाठी ही सुसंधी आहे, हे निश्चित.









