निवृत्त जिल्हा न्यायाधीश-निवृत्त अप्पर निबंधकांची नियुक्ती
बेळगाव : एम. के. हुबळी येथील मलप्रभा सहकारी साखर कारखान्यात घडलेल्या प्रशासकीय व आर्थिक गैरव्यवहारासंबंधीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त जिल्हा न्यायाधीश व सहकार खात्याच्या निवृत्त अप्पर निबंधकांची नियुक्ती केली आहे. साखर व कृषीमंत्री शिवानंद पाटील यांच्या सूचनेवरून निवृत्त जिल्हा न्यायाधीश एस. सी. इंगळगी व निवृत्त अप्पर निबंधक एस. एम. कलुती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2018-19 पासून 2022-23 पर्यंत झालेले गैरव्यवहार, साखर विक्री व साखर साठवण्यासाठी सामग्री खरेदीतील गैरव्यवहार, प्रशासकीय आर्थिक व्यवहारातील नियमबाह्या कारवाया आदींविषयी सविस्तर चौकशी होणार आहे.
या आरोपांसंबंधी संबंधितांना नोटिसा जारी करण्यात आल्या होत्या. तरीही ते गैरहजर राहिले. त्यामुळे या आरोपांच्या चौकशीसाठी निवृत्त जिल्हा न्यायाधीश एस. सी. इंगळगी व सहकार खात्याचे निवृत्त अप्पर निबंधक एस. एम. कलुती यांची नियुक्ती करण्यात आली असून चौकशी अधिकाऱ्यांना तीन महिन्यांत चौकशी पूर्ण करून अहवाल देण्याची सूचना सरकारने केली आहे.
साखरमंत्री शिवानंद पाटील यांनी नुकतीच मलप्रभा सहकारी कारखान्याला भेट दिली होती. त्यावेळी शेतकरी नेत्यांनी कारखान्याच्या सद्यस्थितीबद्दल गंभीर आरोप केले होते. नुकसानीला व्यवस्थापन मंडळच कारणीभूत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. याआधीच्या व सध्याच्या व्यवस्थापन मंडळांमुळेच ही स्थिती निर्माण झाली आहे.उतारा कमी दाखवून मोठ्या प्रमाणात बेकायदा साखर साठवून याचा गैरवापर केला आहे. यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली असून गैरव्यवहार उघडकीस आल्याचे शेतकरी नेत्यांनी साखरमंत्र्यांना सांगितले होते.
याचवेळी जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या अधिक आहे. शेतकरी नेत्यांमधील संघर्षामुळे सहकारी साखर कारखाना नुकसानीत आल्याचा आरोप व्यवस्थापन मंडळाने केला होता. यासंबंधी साखरमंत्र्यांना माहितीही देण्यात आली होती. शेकडो कुटुंबे या कारखान्यावर आपली उपजीविका चालवतात. त्यामुळे योग्य निर्णय घेऊन सरकारने कारखाना चालविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी साखरमंत्र्यांकडे करण्यात आली होती. रुद्राप्पा मोकाशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारखान्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारली त्यावेळी कारखाना तोट्यात होता. तीन वर्षात कर्ज फेडून 15 कोटी रुपये बँकेत ठेवी ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतरच्या व्यवस्थापन मंडळाच्या गैरकारभारामुळे कारखाना नुकसानीत आल्याचा आरोप शेतकरी नेते बसवराज मोकाशी यांनी केला होता. या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर साखरमंत्र्यांनी चौकशीचा आदेश दिला असून निवृत्त न्यायाधीश व निवृत्त अप्पर निबंधकांची यासाठी निवड करण्यात आली आहे.









