वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
निवडणूक आयोगाने सोमवारी एका ऑनलाईन पोर्टलचा शुभारंभ केला आहे. सर्व राजकीय पक्षांना स्वत:चा वित्तीय तपशील आता या पोर्टलवर द्यावा लागणार आहे. वित्तीय तपशीलासोबतच राजकीय पक्षांना निवडणूक खर्च आणि पक्षाला प्राप्त होणाऱ्या आर्थिक देणग्यांची माहितीही द्यावी लागणार आहे. देशात निवडणूक प्रक्रियेला पारदर्शक स्वरुप प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने हे पोर्टल सुरू केले आहे.
हे पोर्टल निवडणूक आयोगाच्या 3सी रणनीतिचा हिस्सा आहे. याच्या अंतर्गत राजकीय वित्तसहाय्य आणि खर्चात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी स्पष्टीकरण, अवैध वित्तसहाय्यावर कारवाई आणि नियमांचे पालन सामील आहे. स्वत:चा वित्तीय तपशील सादर न करणाऱ्या राजकीय पक्षांना लेखी स्वरुपात कारण नमूद करावे लागणार आहे. तसेच सीडी अन् पेन ड्राइव्हसोबत निश्चित स्वरुपात अहवाल जमा करावा लागणार आहे. निवडणूक आयोग सर्व अहवालांना ऑनलाइन प्रकाशित करणार आहे. पोर्टलवर देणगीचा तपशील, लेखापरीक्षण वार्षिक अहवाल, आणि निवडणूक खर्चाचा तपशील नोंद करण्याची सुविधा मिळणार आहे. लोकप्रतिनिधी कायदा 1951 अंतर्गत आयोग वेळोवेळी राजकीय पक्षांना वित्तीय तपशील आयोगाला पुरविणे बंधनकारक आहे.









