केंद्र सरकारकडून 1,555 कोटी रुपये निधी संमत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नैसर्गिक आपत्तीच्या निवारणार्थ केंद्र सरकारने पाच राज्यांना 1,554.99 कोटी रुपयांचे अतिरिक्त अर्थसहाय्य संमत केले आहे. पूर, अतिवृष्टी, भूस्खलन आणि चक्रीवादळे इत्यादी नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या हानीची भरपायी होण्यासाठी हा निधी संमत करण्यात आला आहे. आंध्रप्रदेश, नागालँड, ओडिशा, त्रिपुरा आणि तेलंगणा या पाच राज्यांसाठी ही संमती देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
या निधीपैकी आंध्रप्रदेशला 608.08 कोटी, नागालँडसाठी 170.99 कोटी, ओडीशासाठी 255.24 कोटी, तेलंगणासाठी 231.75 कोटी आणि त्रिपुरासाठी 288.93 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही माहिती सोशल मिडियावरुन प्रसिद्ध केली. आपत्ती निवारणाच्या संदर्भात केंद्र सरकार आपत्तीग्रस्त राज्यांच्या पाठीशी कणखरपणे उभे आहे. बुधवारी घोषित करण्यात आलेली धनराशी ही अतिरिक्त किंवा वाढीव धनराशी आहे. केंद्र सरकार शक्य तितके साहाय्य करण्यापासून मागे हटणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
उच्चस्तरीय समितीची बैठक
नवी दिल्ली येथे केंद्र सरकारच्या एका उच्चस्तरीय बैठकीत हा निधी देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. अनेक राज्यांनी वाढीव निधीची मागणी केली होती. वाढीव निधी मिळणार असलेल्या पाच राज्यांना गेल्या वर्षभरात अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागले आहे. केंद्र सरकारला याची जाणीव असून सर्व राज्यांना समतोल पद्धतीने साहाय्य केले जात आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
आतापर्यंत नेहमीच
गेल्या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने 27 राज्यांना एकंदर 18,332.80 कोटी रुपयांचा नैसर्गिक आपत्ती निवारण निधी दिला आहे. हा निधी एसडीआरएस योजनेतून देण्यात आला असून या निधीसह एनडीआरएफ मधूनही या राज्यांना 4,808.30 कोटी रुपये देण्यात आले आहेत. राज्य आपत्तीनिवारण निधीतूनही या राज्यांना 719.72 कोटी रुपयांचे धनसाहाय्य देण्यात आले आहे.
योग्य सर्वेक्षण करुनच निर्णय
भारताची सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी कोणत्याही राज्यांमध्ये किंवा प्रदेशांमध्ये नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास केंद्र सरकारने तेथे केंद्रीय समित्यांची पाठवणी करते. या समित्या सविस्तर सर्वेक्षण करुन अहवाल तयार करतात आणि तो केंद्र सरकारला दिला जातो. त्या आधारावर कोणत्या राज्यांना किती निधी देणे योग्य ठरेल, याचा निर्णय केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय समितीने घेतला आहे.









