शहरवासियांच्या नजरा अर्थसंकल्पाकडे : दिलासा मिळणार की करवाढीचा फटका?
बेळगाव : महानगरपालिकेतील अर्थ व कर स्थायी समितीची बैठक शुक्रवारी सकाळी होती. मात्र ही बैठक अत्यंत गुप्तपणे घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. या बैठकीला पत्रकारांनाही प्रवेश नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर बैठक घेण्यात आली. मात्र काहीवेळातच बैठक गुंडाळली. दुपारी पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय घेतला गेला. त्या बैठकीमध्ये नेमके काय ठरले? हे आता अर्थसंकल्प सादर होणाऱ्या दिवशीच समजणार आहे. करवाढ होणार की शहरवासियांना पुन्हा दिलासा मिळणार, हे देखील त्यादिवशी पहावे लागणार आहे. अर्थ व कर स्थायी समितीची बैठक अत्यंत गुप्तपणे घेण्यात आली. सत्ताधारी गटातीलही काही मोजकेच नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. अर्थसंकल्प सादर करायचा असेल तर सर्वांना विश्वासात घेऊन सादर करावा लागतो. मात्र काही मोजक्याच नगरसेवकांच्या उपस्थितीत अर्थसंकल्पाबाबत चर्चा करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
सत्ताधारी गटामध्येही सध्या तरी सर्व काही अलबेल आहे, असे यावरून दिसून येत नाही. अर्थ व कर स्थायी समितीच्या अध्यक्षा वीणा विजापुरी यांनी अर्थसंकल्प मांडण्याबाबत सर्व तयारी करण्यात आल्याचे सांगितले. 27 रोजीच आम्ही याबाबत माहिती देऊ, असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले. त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये नेमके दडलंय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरवर्षी अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी तीन पूर्वबैठका घेतल्या जातात. मात्र यावर्षी केवळ एकमेव बैठक घेण्यात आली. वास्तविक जनतेच्या समस्या काय आहेत, अर्थसंकल्प मांडताना त्या निवारणासाठी निधीची तरतूद करणे महत्त्वाचे आहे. मात्र अर्थसंकल्पच अत्यंत गुप्तपणे मांडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वाढीव घरपट्टीबाबत तसेच महापालिकेचे उत्पन्न कशा प्रकारे वाढविता येईल, यावरही चर्चा होणे महत्त्वाचे आहे. अन्यथा केवळ केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीवरच महापालिकेला अवलंबून रहावे लागत आहे. शहरातून मिळणाऱ्या करावर अर्थसंकल्प अवलंबून असतो. त्यामुळे लेखा विभागाचेही म्हणणे ऐकून घेऊन त्यानतंरच अर्थसंकल्प मांडणे गरजेचे आहे. आता अर्थ आणि कर स्थायी समिती काय चर्चा करणार आहे, बेळगावकरांच्या सोयीसाठी कशाप्रकारे अर्थसंकल्प मांडणार हे आता मंगळवारी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.









