मराठीबद्दलचे अनुद्गार भोवले,भावनांची केली कदर
पणजी : मराठी भाषेला कस्पटासमान वागणूक देणाऱ्या फातोर्डाचे गोवा फॉरवर्ड आमदार विजय सरदेसाई यांनी अखेर आपण जे अनुद्गार काढले त्याबद्दल पश्चाताप व्यक्त केला आणि मराठी भाषेबाबत जे सहजपणे उद्गार आल्याने कोणाच्या भावना जर दुखावल्या असतील तर आपण त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो व माफी मागतो, असे निवेदन कऊन या प्रकरणावर अखेर पडदा पाडला आहे. राज्य विधानसभेत सायंकाळी विजय सरदेसाई यांनी स्वत:च हा विषय काढला. मागील शुक्रवारी राज्य विधानसभेत मंत्री सुदिन ढवळीकर हे वीज खात्याच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेला उत्तर देण्यास उभे राहिले असता एका मुद्यावर बोलताना त्यांनी विजय सरदेसाई यांना मराठीतून उत्तर देऊ का? असे विचारले असता विजय सरदेसाई यांनी खंयची मराठी? मराठी नाकाच असे म्हटले होते. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे मंत्री सुदिन ढवळीकर हे गप्पच राहिले. मराठीबाबत जे अनुद्गार काढले त्याला त्यांनी प्रतिकार केला नाही. मात्र या प्रकाराने संतप्त मराठीप्रेमींनी विजय सरदेसाई यांचा निषेध केला व मंत्री सुदिन ढवळीकर यांचाही निषेध केला होता.
गोव्यातील विविध भागातून विजय सरदेसाई यांच्याविरोधात मराठीप्रेमींनी जोरदार टीका सुरू केल्यानंतर मंगळवारी राज्य विधानसभेत सायंकाळी विजय सरदेसाई यांनी तमाम मराठीप्रेमींची माफी मागितली. आम्ही मंत्री सुदिन ढवळीकर यांची सहजपणे चेष्टा-मस्करी करीत असतो. म्हणजे ते काही गंभीरपणे आरोप केलेले नसतात. यावेळी मंत्री ढवळीकर यांनी मराठीतून बोलू का? असे विचारताच आपण त्यांना नको म्हटले होते कारण सभागृहात सर्वांनाच कोकणी समजते या उद्देशाने आपण हे म्हटले होते. मात्र आपल्या तोंडून जर कोणाला ते अनुद्गार वाटत असतील व कोणाच्या भावना जर दुखावल्या आहेत असे वाटत असेल तर आपण त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी मागतो असे ते म्हणाले. यामुळे अखेरीस विजय सरदेसाई यांनी या विषयी स्वत:च तोडगा काढून या वादावर माफी मागून पडदा टाकला.