आज सामना सुरू होण्याअगोदर भारतासमोर आव्हान होते ते विजयी षटकार खेचण्याचे. तर दुसरीकडे इंग्लंडला आपली उरलीसुरली इज्जत वाचवायची. स्पर्धेत आपण किती बलवान आहोत हे या स्पर्धेत या अगोदर पाच सामने जिंकत भारताने दाखवून दिले होते. अर्थात कालचा इंग्लंडचा सामना त्याला अपवाद ठरला नाही. इंग्लंडकडे जोस बटलरपासून ते जॉनी बेअरस्टोपर्यंत एकापेक्षा एक सरस खेळाडू असताना त्यांच्या बहुतांश खेळाडूंनी मम: म्हणायचं काम केलं. आज आपण प्रथम फलंदाजी करताना आपले सुरुवातीचे फलंदाज थोडेसे भांबावलेले दिसले. ज्या पद्धतीने कोहली बाद झाला ते पण थोडसं आश्चर्याचं वाटलं. कारण नसताना स्टेप आउट होत आपलं खातं खोलण्याचा जो मनसुबा होता, तो भलताच अंगाशी आला. सुरवातीच्या पडझडीनंतर रोहितने खऱ्या अर्थाने संघाचे पालकत्व स्वीकारले. आज त्याची बॅट गनमशीन निश्चित नव्हती. परंतु ज्या धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या, त्या पिगीबँकसारख्या होत्या. शेवटच्या क्षणी कामास आल्या. पहिल्या पाच सामन्यात खेळपट्टी फलंदाजांच्या प्रेमात होती. पण आज चेंडू खेळपट्टीच्या प्रेमात होती परंतु या सर्वात रोहित शर्माचे प्रेम एकतर्फी दिसलं. कोण म्हणतो रोहितकडे पदलालित्य नाही. गोलंदाजास पोषक असलेल्या खेळपट्टीवर रोहितची खेळी खऱ्या अर्थाने प्रेक्षकांसाठी मेजवानी होती. रोहितची कालची खेळी चिकन बिर्याणी किंवा मटन बिर्याणीसारखी निश्चित नव्हती. परंतु जी थाळी होती ती थाळी मात्र निश्चितच तृप्ततेची ढेकर देणारी होती. दुसऱ्या बाजूला सूर्याची संयमी खेळी त्याच्या निवडीसाठी योग्यच होती, हे सूर्याने ठणकावून सांगितलं.
बुमराह आणि शमी नावाची जोडगोळी गोऱ्यांना एखाद्या नैसर्गिक आपत्तीसारखी वाटली. ज्या नैसर्गिक आपत्तीसमोर बऱ्याच संसाराची राखरांगोळी होते, तशीच काहीशी राखरांगोळी इंग्लंडची झाली. इंग्लंडचा संघ या पूर्ण स्पर्धेत एखाद्या क्लब क्रिकेटसारखा खेळला. त्यांच्या या पराभवाची दखल इंग्लंडच्या संसदीय भवनात नक्कीच घेतली जाणार. इंग्लंडचा संघ पूर्ण स्पर्धेत रामदास पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्यातल्या अर्धवटरावसारखा वाटला. दुसऱ्या बाजूने इंग्लंडचे फलंदाज पूर्णत: बुजगावण्यासारखे वाटले, कोणीही यावं आणि त्यांना टपली मारून जावं, अशी परिस्थिती त्यांनी स्वत:हून करुन घेतली. 24 कॅरेट सोनेवाला संघ प्रत्यक्षात मात्र बेन्टेक्सवाला निघाला, हे क्रिकेटचे दुर्दैव आणखी काय म्हणावं! 1990 च्या दशकात ज्यावेळी भारतीय संघ इंग्लंडमध्ये गेला होता त्यावेळी भारताची कामगिरी खराब होत होती. त्यावेळी तत्कालीन कोच स्वर्गीय बिशनसिंग बेदी म्हणाले होते, की तुमची अशीच कामगिरी राहिली तर पूर्ण संघाला अरबी समुद्रात बुडवलं पाहिजे. नेमकं हेच वाक्य आता इंग्लंडच्या कोचच्या मनात आलं तर नवल वाटायला नको. या सामन्यात भारतीय संघाने दाखवून दिले की धावांचा पाठलाग करताना आम्हीच बादशहा. आणि छोटेखानी धावसंख्या रोखायची असेल तर आमचेच गोलंदाज कर्दनकाळ, हे रोहितच्या टीम इंडियाने पुन्हा एकदा दाखवून दिले. भारतासाठी बुमराह आणि शमी हुकमाचे एक्के तर दुसरीकडे कुलदीप ट्रम्प कार्ड या दोन्ही कार्डाचा रोहितने अगदी छान वापर करून घेतला हे विशेष.
कालच मी म्हणालो होतो, साहेबांची वेळ येऊन ठेपली आहे, ती हातात नारळ देण्याची. हा स्तंभ संपवताना मला लतादीदींचे ते एक गीत आठवलं. अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते गाव. अर्थात ती वेळ येऊन ठेपली आहे इंग्लंडला गुडबाय म्हणण्याची. हाच का तो इंग्लंडचा विश्वविजेता संघ ज्याने मागील विश्वचषक जिंकला होता, बघाना काय हाल झालेत मागील विश्वविजेत्याचे. यालाच म्हणतात क्रिकेट!
विजय बागायतकर, क्रिकेट समालोचक









