ग्रामस्थ-पालकांमधून समाधान : टाळे ठोकून केलेल्या आंदोलनाला यश
वार्ताहर/उचगाव
बाची येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेतील शिक्षिका एन. एम. चांदीलकर यांची बदली रद्द करावी, यासाठी ग्रामस्थ, पालक यांनी शनिवारी मराठी शाळेसमोर आंदोलन छेडून उठवलेल्या जोरदार आवाजामुळे शिक्षण खात्याने अखेर त्यांची बदली रद्द केली आहे. यामुळे ग्रामस्थ आणि पालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. बाची गावातील प्राथमिक मराठी शाळेतील शिक्षिका एन. एम. चांदीलकर यांची बदली कुद्रेमनी येथील शाळेमध्ये करण्यात आली होती. ही बदली रद्द करावी, अशी मागणी पालकवर्ग आणि शाळा सुधारणा समितीने शिक्षण खात्याकडे केली होती. शनिवार दि. 23 ऑगस्ट रोजी गावातील सर्व ग्रामस्थ, पालक, महिला मंडळ यांनी शाळेच्या गेटला टाळे ठोकून आंदोलन छेडले आणि शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने भेट देऊन ही बदली रद्द करावी, अशी जोरदार निदर्शने केली होती.
मात्र शनिवारी कोणीही शाळेकडे न आल्याने या शाळेचे टाळे खोलण्यात आले नव्हते. अखेर सोमवार दि. 25 ऑगस्ट रोजी शिक्षण खात्याचे अधिकारी यांनी बाची गावाला भेट देऊन या शाळेच्या संदर्भात सविस्तर पालकांचे म्हणणे ऐकून घेऊन अखेर शिक्षिका चांदीलकर यांची बदली रद्द केल्याचे पत्र आंदोलन छेडणाऱ्या ग्रामस्थांना दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. आणि शाळेचे टाळे खोलण्यात आले. यावेळी सदर शिक्षिकेला शाळेमध्ये कायमस्वरूपी ठेवावे, अशी मागणीही पालकांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे. या सर्व घडामोडीनंतर संबंधित शिक्षिकेची बदली रद्द करण्यात आल्याची माहिती शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे शाळा सुधारणा समितीसह पालकवर्गांत समाधान व्यक्त होत आहे.









