महापालिकेची कारवाई : विरोधी गट नेते डोणी यांच्या मागणीची दखल
बेळगाव : खंजर गल्लीतील महापालिकेच्या मालकीच्या लक्ष्मी मार्केटमध्ये काहींनी अतिक्रमण करून अवैध धंदे सुरू केले आहेत. मात्र, याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले असल्याने स्थानिक नगरसेवक म्हणून आपली बदनामी होत असल्याची तक्रार मनपाचे विरोधी गट नेते मुज्जमिल डोणी यांनी नुकत्याच झालेल्या अर्थ व कर स्थायी समिती बैठकीत केली होती. या तक्रारीची दखल घेत सोमवारी मनपातर्फे खंजर गल्लीतील लक्ष्मी मार्केटमध्ये अनधिकृतपणे उभालेले शेड अखेर हटविले. लवकरच त्याठिकाणी महापालिकेच्या मालकीची जागा असल्याचा फलकदेखील लावला जाणार आहे.
लक्ष्मी मार्केट येथील 5 एकर 18 गुंठे जागा मनपाच्या नावे आहे. मोडका बाजार भरणारी ही जागा महापालिकेने आपल्या ताब्यात घेतली. त्याठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात येणार असल्याचे गेल्या अनेक वर्षांपासून सांगितले जात आहे. त्यासाठी काहीवेळा निविदा प्रक्रियाही राबविली. पण पार्किंगची सोय मात्र काही झाली नाही. उलट या ठिकाणाहून महापालिकेला एक रुपयांचा महसूलदेखील मिळाला नाही. त्याचबरोबर मनपाच्या मालकीची ही जागा बळकावली जाण्याची भीती व्यक्त होत आहे. मनपाच्या दुर्लक्षपणामुळे या ठिकाणी जुगार व मटका अड्डे चालवितात त्यासाठी शेडही उभारले होते.
मनपाच्या जागेचा फलक लावणार
लक्ष्मी मार्केट हा भाग मनपाचे विरोधी गट नेते मुज्जमिल डोणी यांच्या प्रभागात येतो. डोणी हे सलग तीनवेळा नगरसेवक म्हणून या भागातून निवडून आले आहेत. पण त्यांच्यासारख्या जबाबदार नेत्यांच्या प्रभागातच महापालिकेच्या जागेत जुगार व मटका सुरू असल्याने याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू होती. त्यामुळे डोणी यांनी सर्वसाधारण सभेतही या जागेचा प्रश्न उपस्थित केला होता. नुकत्याच झालेल्या अर्थ व कर स्थायी समिती बैठकीत यावर आवाज उठवून अतिक्रमण हटविण्यासह त्याठिकाणी मनपाचा फलक लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार सोमवारी महापालिकेच्या अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर व त्यांचे सहकारी लक्ष्मी मार्केटमध्ये दाखल झाले. त्याठिकाणी बेकायदेशीररित्या घातलेले शेड हटविले. त्याचबरोबर लवकरच त्याठिकाणी महापालिकेची जागा अशा आशयाचा फलक उभारण्यात येणार आहे.









