ग्रामस्थांतून समाधान : महानगरपालिकेबद्दल मात्र तीव्र संतापच
बेळगाव : कणबर्गी येथे सोमवारी रास्तारोको करून ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. याचबरोबर कणबर्गी येथील धर्मवीर संभाजी चौक येथे मातीचा ढीग टाकून रस्ता अडविण्यात आला होता. तो रस्ता खुला करावा, अशी मागणी बहुसंख्य ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार मंगळवारी तेथील माती काढून ये-जा करण्यासाठी हा रस्ता खुला करण्यात आला आहे. कणबर्गी व परिसराकडे महानगरपालिकेचे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. स्मार्ट सिटीमध्ये आलेला निधी कणबर्गी गावात खर्चच करण्यात आला नाही. काही कामे अर्धवट आहेत. त्यामुळे कणबर्गीवासियांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मुख्य रस्त्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत गेल्या सहा महिन्यांपासून रस्ता उखडून ठेवला आहे. मात्र त्यानंतर दुरुस्तीच केली नाही. कणबर्गी गाव हे शेतीप्रदान आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जनावरेही पाळली आहेत. त्यांना चारा ने-आण करावा लागतो. मात्र या रस्त्यावरून ये-जा करणे अवघड जात होते. वारंवार कळवूनही याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सोमवारी धर्मवीर संभाजी चौक येथे मातीचा ढीग टाकून रस्ता अडविला होता. मात्र त्यामुळे कणबर्गीवासियांनाच त्रास होत असल्यामुळे तो खुला करावा, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर हा रस्ता खुला केला आहे.









