बलराम शिक्षणसंस्थेची कडक कारवाई
काणकोण : आमोणे येथील बलराम शिक्षणसंस्थेच्या आश्रम शाळेतील इयत्ता सहावीच्या मुलाला मारहाण केल्याचा आरोप असलेले शिक्षक प्रसाद पागी यांना अखेर शिक्षणसंस्थेने निलंबित केले आहे. या संस्थेचे अध्यक्ष अंकुश गावकर यांनी तसा आदेश काढला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आणि तपास काणकोणचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गावस करत आहेत. आश्रम शाळा ही अशा प्रकारची गोव्यातील एकमेव शिक्षणसंस्था असून केंद्र सरकारच्या आर्थिक साहाय्यावर सुरू केलेल्या या शाळेचे संस्थापक असलेले काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर आणि या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सविता तवडकर या सध्या आफ्रिका दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधता आला नाही. ते गोव्यात परतल्यानंतर या प्रकरणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुख्याध्यापिका सविता तवडकर या सध्या सीसीएल रजेवर असून विद्यालयाचा कारभार प्रभारी मुख्याध्यापिका वंदना गावकर सांभाळत आहेत.
या संस्थेच्या काणकोणात अर्धफोंड येथे बलराम उच्च माध्यमिक विद्यालय, मोखर्ड येथे बलराम डे केअर विद्यालय, आमोणे येथे मुलांसाठी आणि मुलींसाठी वसतिगृहे, तळे-गावडोंगरी, अवें-खोतीगाव या ठिकाणी प्राथमिक शाळा व शिशुवाटिका आहेत. प्रसाद पागी हे या विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षकांपैकी एक असून लोककलाकार, नाट्याकलाकार, उत्कृष्ट घुमटवादक, तबलावादक आहेत. त्यांचे परदेश वारीवर आधारित ‘फ्लोटिंग डॉक’ हे पुस्तक प्रसिद्ध झालेले आहे. पागी हे कवी असून दरवर्षी लोकोत्सवात त्यांची रचना, संगीत असलेले केवळ लोकसंस्कृतीवर आधारित असे स्वागतगीत हे एक आकर्षण ठरलेले आहे. यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांत त्याचप्रमाणे अखिल गोवा क्षत्रिय पागी समाज संघटनेच्या कार्यकारिणीवर काम केलेले आहे, अशी माहिती त्यांच्या हितचिंतकांनी आणि सहकाऱ्यांनी दिली. या प्रकरणात राजकारण आणू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.









