श्रमदानातून खड्डे बुजविण्याचा विद्यार्थ्यांचा उपक्रम कौतुकास्पद
वार्ताहर /किणये
बेळगाव-चोर्ला रोडवरील किणये गावाजवळील पुलावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. या खड्ड्यांमुळे अनेक अपघातांच्या घटना घडल्या आहेत. गेल्या दोन वर्षापासून प्रशासनाचे या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. किणये गावातील विद्यार्थ्यांनी रविवारी श्रमदानाने पुलावरील खड्डे बुजविले आहेत. किणये मुंगेत्री नदीवरील पुलाच्या रस्त्यावर धोकादायक खड्डे पडले होते याचा वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. या भागातील नागरिकांनी तसेच वाहनधारकांनी अनेकवेळा सदर ठिकाणचे खड्डे बुजविण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार नागरिकांतून व्यक्त होत आहे. अलीकडे बेळगाव-चोर्ला रोडवरून गोव्याला ये-जा करणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढली आहे. गोव्याहून सुसाट वाहने धावतात. या वाहनांचा स्थानिक नागरिकांना नेहमीच त्रास होतो. किणये पुलाजवळ भलेमोठे खड्डे असल्यामुळे अनेकवेळा वाहनांचे अपघातही घडले आहेत. प्रशासनाचे रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले असल्यामुळे अखेर तिन्ही गावातील काही विद्यार्थ्यांनी रविवारी सुटीच्या दिवशी खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला आणि मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये चीपिंग व मुरूम टाकून श्रमदानाने या खड्ड्यांची दुरुस्ती केली. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे. रोहित पाटील, मल्लाप्पा लोहार, साहिल पाटील, अथर्व पाटील, धनंजय पाटील, अनिकेत पाटील आदींनी खड्डे बुजवण्यासाठी परिश्रम घेतले.









