गुरुवारी झाले उद्घाटन, कामकाजालाही सुरुवात
बेळगाव : दक्षिण उपनोंदणी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या उपनोंदणी कार्यालयामध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. गुरुवारी या कार्यालयाचे उद्घाटन हेडक्वॉर्टर्सचे साहाय्यक नोंदणी अधिकारी एम. बी. धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून दक्षिण उपनोंदणी कार्यालय स्थलांतरित करावे, अशी मागणी जोर धरत होती. पूर्वी हे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच होते. मात्र, राणी चन्नम्मानगर येथे हे कार्यालय हलविण्यात आले. त्यामुळे वकील, तसेच इतरांना त्याचा त्रास होत होता. चन्नम्मानगरला जाणे कठीण झाले होते. बससेवा व इतर कोणतीही सुविधा नसल्यामुळे समस्या निर्माण झाली होती. शहरातील विविध संघटनांनी हे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच हलवावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार हे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या नोंदणी कार्यालयात स्थलांतरित करण्यात आले. आता यापुढे या ठिकाणी दक्षिण विभागातील सर्व कामे केली जाणार आहेत. यावेळी उपनोंदणी अधिकारी आनंद बदनीकाई यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.









