सफाई कामगारांचा संप मागे, आर्थिक टंचाईमुळे होते तारेवरची कसरत
प्रतिनिधी /वाळपई
वाळपई नगरपालिकेत आर्थिक टंचाई भासत असून कामगारांना महिन्याचा पगार देताना व्यवस्थापनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळेच सफाई कामगारांना पगार देण्यास उशीर झाला. सफाई कामगारांनी सोमवार दुपारपर्यंत पगार न मिळाल्यास बेमुदत संपाचा इशारा दिला होता. पालिका व्यवस्थापनाने जुळवाजुळव करून सदर कामगारांना सोमवारी सकाळी पगार दिला. यामुळे कामगारांनी आपला संप मागे घेतल्याचे जाहीर केले.
वाळपई नगरपालिकेच्या सफाई कामगारांना पगार देण्यास उशीर झाल्यामुळे शनिवारी कामगारांनी आक्रमक पवित्रा घेत सोमवारी दुपारपर्यंत पगार न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला होता. पालिका व्यवस्थापनाने याची दखल घेऊन सोमवारी सकाळीच पगार दिला. यामुळे सध्यातरी सफाई कामगारांचा प्रश्न मिटलेला आहे. मात्र नगरपालिकेची आर्थिक कसरत सुरूच राहणार आहे.
सफ्ढाई कामगारांना सोमवारी सकाळी पगार मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र यापुढे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यास संपाशिवाय दुसरा मार्ग नसल्याचे कामगारांनी सांगितले.
सफ्ढाई कामगारांना पगार देण्याची पूर्ण तयारी झाली होती. मात्र पालिका मुख्याधिकाऱयांना शुक्रवारी पणजी याठिकाणी एका विशेष बैठकीमध्ये उशिरापर्यंत राहावे लागले यामुळे त्यांना शनिवारी पगार झाला नाही. अन्यथा पगाराची तरतूद करण्यात आली होती. कामगारांनी नगरपालिकेची बदनामी करण्यासाठी घेतलेली भूमिका अयोग्य होती, अशी खंत नगराध्यक्ष सेहझीन शेख यांनी व्यक्त केली.
पालिकेची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे. पालिकेचा महसूल समाधानकारक गोळा होत नाही. यामुळे महिन्याच्या अखेरीस पगार देताना व्यवस्थापनाला कसरत करावी लागते. सफ्ढाई कामगारांना पगार देण्यास उशिरा होण्यास कारण नव्हते. आपण शुक्रवारी पणजी येथील एका बैठकीमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांचा शनिवारी पगार झाला नाहा ही वस्तुस्थिती आहे, असे मुख्याधिकारी सूर्याजीराव राणे यांनी सांगितले.
वाळपई नगरपालिका ही ‘क’ दर्जाची आहे. यापूर्वी पालिकेला 55 लाखांचा महसूल मिळत होता. मात्र यावषी तो बंद झालेला आहे. त्यामुळे पालिकेचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. याचा परिणाम कर्मचाऱयांच्या पगारावर झाला आहे. व्यवस्थापनाला पगाराची तरतूद करताना जुळवाजुळव करावी लागते. यामुळे काही वेळा पगार देण्यास उशीर होतो. जोपर्यंत सरकारने बंद केलेला महसूल पुन्हा सुरू होत नाही तोपर्यंत ‘क’ दर्जांच्या नगरपालिकेची अशीच स्थिती होणार आहे, असे मुख्याधिकारी राणे यांनी सांगितले.
वाळपई नगरपालिका क्षेत्रात घरोघरी कचरा गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पालिकेतर्फे प्रत्येक घराच्या मागे फक्त तीनशे रुपये कर आकारण्यात येत आहे. मात्र गोव्यातील इतर ‘क’ दर्जाच्या नगरपालिकेकडून घरामागे रुपये सातशे कर आकारण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱया काळात ही रक्कम वाढविणे अत्यंत गरजेचे असून तसेच झाल्यास पालिकेच्या महसुलामध्ये भर पडू शकते व निर्माण होणाऱया समस्या बऱयाच प्रमाणात कमी होऊ शकतात, असे राणे यांनी सांगितले.
महसूल वसुलीसाठी कठोर निर्णय : राणे
नगरपालिका क्षेत्रातील महसूल गोळा करण्यासाठी हल्ली काही कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. पालिका क्षेत्रातील बँका, पतपुरवठा संस्था यांनी विक्री व व्यवसाय प्रमाणपत्र घेतले नव्हते या संदर्भात त्यांना नोटीस पाठविण्यात आल्यानंतर अनेक संस्थानी पालिकेशी संपर्क साधून आपले प्रमाणपत्र घेतले आहे. यामुळे पालिकेच्या तिजोरीत चांगल्या प्रकारे महसूल आला आहे. तसेच पालिका क्षेत्रातील अनेक दुकानदाराकडून मोठय़ा प्रमाणात थकबाकी येणे आहे. या थकबाकीदारांना नोटीस पाठवून वसुलीसाठी प्रयत्न करण्यात येतील, असे मुख्याधिकारी सूर्याजीराव राणे यांनी सांगितले.









