वार्ताहर/उचगाव
उचगाव-कोवाड मार्गावरील अतिवाड फाटा ते महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्ती कामाचा शुभारंभ गुरुवारी कर्नाटक राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आला. एक किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली होती. यासंदर्भात कर्नाटक राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना अनेकवेळा या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी तसेच निवेदन देण्यात आले होते.यावेळी आमदार फंडातून या रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला असून, या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
दै. ‘तरुण भारत’ वृत्ताची दखल
कर्नाटक, महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे. कर्नाटकातून महाराष्ट्र हद्दीत प्रवेश करताना या एक किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण होते. यावेळी ‘तरुण भारत’मधून अनेकवेळा या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशाप्रकारचे वृत्त छापून शासनाला जाग आणली होती. याची दखल हेब्बाळकर यांनी घेऊन रस्ता तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार दुरुस्ती कामाला लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. अतिवाड, बेकिनकेरे व भागातील नागरिक यावेळी उपस्थित होते.









