केएएस अधिकारी डॉ. सिद्धू हुल्लोळी यांची नियुक्ती
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिका सभागृहाची स्थापना दि. 7 फेब्रुवारी रोजी होणार असून 21 व्या कार्यकालावधीसाठी महापौर-उपमहापौर निवड केली जाणार आहे. पण महापालिकेतील कौन्सिल सेक्रेटरीपद रिक्त असल्याने या पदी केएएस श्रेणीतील अधिकारी डॉ. सिद्धू हुल्लोळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळी त्यांनी कौन्सिल सेक्रेटरीपदाचा कार्यभार स्वीकारला.
महापालिकेला कित्येक वर्षांपासून कायमस्वरुपी कौन्सिल सेक्रेटरी मिळत नाही. मागील सभागृहात देखील सदर पदाची जबाबदारी प्रभारींकडेच सोपविण्यात आली होती. आताही प्रभारी अधिकाऱ्यांकडे या पदाचा कार्यभार देण्यात आला होता. पंधरा दिवसांपूर्वी या पदावर चिकोडीचे प्रांताधिकारी संतोष कामगौडर यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण ते या ठिकाणी काम करण्यास इच्छुक नसल्याने त्यांची अन्यत्र बदली झाली आहे. त्यामुळे कौन्सिल सेक्रेटरीपदी डॉ. सिद्धू हुल्लोळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बुधवारी महापालिका कार्यालयात ऊजू होऊन त्यांनी कार्यभार स्वीकारला आहे. दि. 7 फेब्रुवारी रोजी महापौर-उपमहापौर निवडणूक घेतली जाणार आहे. त्यादृष्टीने कौन्सिल विभागाने तयारी चालविली आहे. कौन्सिल विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या विविध कामांची तयारी सुरू आहे. महापौर-उपमहापौर कक्ष, सभागृह, स्थायी समिती, सत्ताधारी-विरोधी गटाचे कक्ष स्वच्छ करून आसन व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. नव्याने दाखल झालेले कौन्सिल सेक्रेटरी डॉ. सिद्धू हुल्लोळी यांच्या मार्गदर्शनाने कौन्सिल विभागाचे कामकाज चालणार आहे.









