नगरसेवकांतून समाधान : 14 फॉगिंग मशीन खरेदी, आता तरी फवारणी करण्याची मागणी
बेळगाव : महापालिकेने शहरामध्ये औषध फवारणी करावी, अशी मागणी वारंवार करण्यात आली. मात्र महापालिकेकडे फॉगिंग मशीनच उपलब्ध नव्हत्या. याबाबत नगरसेवक रवी साळुंखे यांनी फॉगिंग मशीन खरेदी करून औषधांची फवारणी करावी, अशी मागणी वारंवार केली होती. त्यानंतर फॉगिंग मशीन खरेदी करण्यात आल्या. मात्र त्या खराब निघाल्या. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. या प्रकारामुळे शेवटी महापालिकेने नव्याने 14 फॉगिंग मशीन खरेदी केल्या आहेत. त्यामुळे आता शहरामध्ये फवारणी करणे सोपे जाणार आहे. फॉगिंग मशीन आल्या असून आता लवकरच शहरात सर्वत्र औषध फवारणी करण्यात येणार आहे. वास्तविक पावसाळा सुरू झाल्यानंतर तातडीने फवारणी करणे गरजेचे आहे. मात्र याबाबत कोणीच गांभीर्याने घेतले नाही. नगरसेवकांनी महापालिकेला जाग आणली. त्यानंतर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले.
शहरातील स्वच्छतागृहांचीच स्वच्छता करा
शहरामध्ये जनतेसाठी केलेली स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यांची स्वच्छता करावी, अशी मागणी माजी महापौर विजय मोरे व नगरसेवक रवी साळुंखे यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. स्वच्छतागृहांना दरवाजा नाही. दररोज पाणी मारण्यात येत नाही. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. तेव्हा तातडीने याची दुरुस्ती करावी. याचबरोबर रोजच्या रोज स्वच्छता करावी, अशी मागणी त्यांनी केली.









