खासगी कार्यक्रमांसाठी परवानगीची गरज नाही : निवडणुकीचा प्रचार-कार्यक्रमासाठी परवानगी घेणे बंधनकारक
बेळगाव : विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाल्याने निवडणूक काळात खासगी कार्यक्रम करण्यासाठी निवडणूक विभागाची परवानगी बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र निवडणूक कार्यालयात परवानगीसाठी अर्ज केला असता परवानगीची गरज नसल्याचे सांगण्यात येत आहे. खासगी कार्यक्रमांसाठी परवानगीची अट मागे घेण्यात आल्यामुळे वऱ्हाडकरांची धावपळ थांबली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तसेच सभा, समारंभ, बैठका आयोजित करण्यासाठी निवडणूक विभागाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. याचबरोबर खासगी कार्यक्रमासाठीदेखील परवानगी घेण्याची अट लादण्यात आली होती. विवाह, नामकरण सोहळा, रिसेप्शन, वाढदिवस अशा विविध कार्यक्रमांसाठी निवडणूक विभागाकडून परवानगी घेण्याची सूचना करण्यात आली होती. कार्यक्रमाची तयारी करण्याची धावपळ असतानाच ही नवीन अट लादल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली होती.
विवाह कार्यक्रमासाठी तयारी करताना दमछाक होते. निमंत्रण पत्रिका देणे, खरेदी आदींसह पै-पाहुण्यांचे स्वागत करणे, बस्ता खरेदी करणे अशा विविध कामांच्या धावपळीत असणाऱ्या वऱ्हाडकरांना निवडणूक विभागाच्या कार्यालयात परवानगीसाठी धाव घ्यावी लागत होती. मात्र खासगी कार्यक्रमांसाठी असलेली परवानगीची अट निवडणूक विभागाने मागे घेतली आहे. विवाह कार्यक्रमासाठी परवानगी घेण्याकरिता वऱ्हाडकरांना स्पीकर, बँड लावण्यासाठी पोलीस परवानगी घ्यावी लागत होती. त्याचप्रमाणे त्याकरिता बेळगाव वन कार्यालयात जाऊन चलन भरावे लागत होते. मात्र खासगी कार्यक्रमासाठी परवानगीची गरज नसल्याचे सांगण्यात आल्याने नागरिकांची धावपळ कमी होणार आहे. निवडणूक विभाग कार्यालयात परवानगीसाठी अर्ज केला असता खासगी कार्यक्रमाकरिता परवानगी घेण्याची गरज नाही, असे सांगण्यात येत आहे. याबाबत निवडणूक आयोगाचा आदेश जारी झाला आहे का? याची विचारणा निवडणूक कार्यालयात केली असता, असा आदेश जारी झाला नाही. मात्र प्रचाराच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी परवानगी घेणे बंधनकारक आहे. खासगी कार्यक्रम आयोजित करताना निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला निमंत्रण देण्यात येऊ नये, तसेच कोणत्याही पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह कार्यक्रमस्थळी लावण्यात येऊ नये, अशा विविध सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. निवडणूक विभागाची परवानगी घेण्याची अट मागे घेण्यात आल्याने वऱ्हाडकरांची डोकेदुखी कमी झाली आहे.









