आव्हान याचिका न्यायालयाने फेटाळली : नियोजित वेळापत्रकानुसार 19 रोजी मतदान
प्रतिनिधी / पणजी
गोवा डेअरीच्या निवडणुकीला तसेच उमेदवारी अर्ज फेटाळणाऱया निर्वाचन अधिकाऱयाच्या कृतीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळून लावल्यामुळे निवडणुकीचा मार्ग खुला झाला असून ती आता ठरलेल्या वेळापत्रकानुसार येत्या रविवारी 19 जून रोजी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दूध पुरवठादार रमेश एडाथडन यांनी सदर याचिका दाखल केली होती. त्यांचा उमेदवारी अर्ज नियमात बसत नसल्यामुळे निर्वाचन अधिकाऱयांनी फेटाळून लावला होता. त्यास एडाथन यांनी आव्हान देऊन निवडणूक प्रक्रिया रोखण्याची मागणी केली होती. परंतु ती मागणी खंडपीठाने मान्य केली नाही.
नियमानुसार एडाथन यांनी 280 दिवस दूध पुरवठा केला नाही, असा ठपका ठेवून खंडपीठाने याचिका निकालात काढली. त्यामुळे निवडणुकीवर कोणताही परिणाम झालेला नसून ती ठरल्यानुसार होणार आहे. निर्वाचन अधिकारी म्हणून राजू मगदूम काम पहात आहेत.
तीन पॅनल्स रिंगणात
दरम्यान रविवारी गोवा डेअरीच्या 12 सदस्यांच्या संचालक मंडळासाठी फोंडा येथे निवडणूक होणार असून त्याकरीता एकूण 38 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 3 गट निवणुकीत उतरले असून त्यात माधव सहकारी, विठोबा देसाई व श्रीकांत नाईक यांच्या गटाचा समावेश आहे. सुमारे 3 वर्षापूर्वी संचालक मंडळ बरखास्त करण्यात आल्यानंतर वर्षभर गोवा डेअरीवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती. नंतर डेअरीचा कारभार त्रिसदस्यीय समितीकडे सोपवण्यात आला होता. आता निवडणूक जाहीर झाल्यानंतर ती समिती देखील बरखास्त करण्यात आली असून निवडणुकीनंतर डेअरीवर नवीन संचालक मंडळाची स्थापना होणार आहे. गोवा डेअरीची निवडणूक बिनविरोध व्हावी किंवा ठरवावी म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी प्रयत्न केले. परंतु ते फळास आले नाहीत.









