पर्वरी, साळगांवमधील लोकांना मिळणार पाणी : पुढील दोन दिवसात पाणीपुरवठा सुरू होणार
पणजी : पाण्याच्या प्रचंड दाबामुळे अडकून पडलेला तिळारी धरणाचा दरवाजा उघडण्यास अखेर जलस्रोत खात्याच्या अभियंत्यांना यश आले आहे. त्यामुळे खास करून पर्वरी व साळगांव मतदारसंघातील लोकांवर आलेले पाणी संकट टळले आहे. बुधवारी सकाळी धरणाचा दरवाजा उघडताच पाण्याच्या जोरदार प्रवाहाने ‘माहेरच्या ओढीने उतावीळ झालेल्या नवविवाहितेगत’ गोव्याच्या दिशेने धाव घेतली. पुढील दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. तिळारी धरणाचा अडकून पडलेला दरवाजा उघडण्याचे प्रयत्न मंगळवारी उशिरांपर्यंत सुरू होते. अथक प्रयत्नांती बुधवार दि. 27 डिसेंबर रोजी पहाटे 5.45 वाजता दरवाजा उघण्यात आला, अशी माहिती जलस्रोतच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे आता पर्वरी, साळगाव मतदारसंघातील लोकांना दोन दिवसांत पाणी मिळण्याची शक्यता आहे.
सध्या 10 क्युसेक पाणीपुरवठा
या दरवाजा दुऊस्तीवेळी कार्यकारी अभियंता विनायक जाधव, गोवा जलसंपदा खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी, उपविभागीय अधिकारी गजानन बुचडे, यांत्रिकी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. मंगळवारी सकाळी सुरू झालेले दुऊस्तीचे काम बुधवार पहाटेपर्यंत सुरू राहिले आणि अखेर गेट उघडले. सध्या 10 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. जसजशी गोव्याची पाण्याची मागणी वाढेल, तसतसा यापुढे पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता जाधव यांनी दिली.
दोन महिन्यांपासून पाणी समस्या
गत दोन महिन्यांपासून गोवा व महाराष्ट्र राज्यांच्या हद्दीतील कालव्यांच्या दुरुस्तीकामांमुळे तिळारी धरणातून गोव्यात होणारा पाणीपुरवठा बंद होता. गोव्यातील कालव्यांची कामे पूर्ण झाली असली तरीही पाण्याच्या प्रचंड दाबामुळे धरणाचा कालव्यात उघडणारा दरवाजा अडकून पडला होता. गेल्या दोन दिवसांपासून तो उघडण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र त्यामुळे गोव्यात होणारा पाणीपुरवठा थांबला होता. प्रत्यक्षात दि. 23 डिसेंबरपासून तिळारीचे पाणी येईल व उत्तर गोव्यातील पाणी पुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षा जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी वर्तविली होती. परंतु तांत्रिक अडचणींमुळे ती फोल ठरली होती.
अभियंत्यांच्या प्रयत्नांना यश
आता अखेरीस धरणाचा दरवाजा उघडण्यात या क्षेत्रातील तज्ञ असलेल्या पुणे येथील अभियंत्यांना यश आले आहे. तत्पूर्वी रविवार, सोमवार हे दोन दिवस त्यांनी धरणाच्या दरवाजाची पाहणी केली. सदर कालव्यांच्या दुऊस्तीमुळे गत दीड महिन्यापासून धरणाचा दरवाजा बंद करण्यात आला होता. त्यावर पाण्याचा प्रचंड दाब पडल्याने दरवाजा थोडा दबला होता. परिणामी मोटरचा वापर करूनही तो उघडणे अवघड बनले होते. त्यामुळे सदर दरवाजा वर उचलण्यासाठी खास यंत्रसामग्री मागविण्यात आली. ती सोमवारी रात्री एक वाजता धरणाच्या ठिकाणी पोहोचली. त्यानंतर रात्रभर दरवाजा उघडण्याचे प्रयत्न करण्यात आले. हे प्रयत्न मंगळवारी उशिरांपर्यंत सुरू होते. अथक प्रयत्नांती बुधवार दि. 27 डिसेंबर रोजी पहाटे 5.45 वाजता दरवाजा उघण्यात आला, अशी माहिती जलस्रोतच्या अधिकाऱ्यांनी दिली. आता पुढील दोन दिवसात हे पाणी पर्वरी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात येणार असून तेथे प्रक्रिया केल्यानतंर ते लोकांसाठी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या लोकांना दिलासा मिळाला आहे.
गोव्यातील कालव्यांचे मजबुतीकरण
या प्रकल्पांतर्गत खात्याने गोवा सीमेवरील कालव्यांचे मजबुतीकरण पूर्ण केले आहे. अस्नोडा, पर्वरी जलशुद्धीकरण प्रकल्पाना पाणी पुरवणाऱ्या 4.50 कि.मी. लांबीच्या डाव्या मुख्य कालव्याचे तसेच चांदेल जलशुद्धीकरण प्रकल्पाला पाणी पुरवणाऱ्या सुमारे 5 किमी लांबीच्या उजव्या बाजूच्या मुख्य कालव्याचे मजबुतीकरण पूर्ण झाले आहे.
आज सायंकाळपर्यंत पाणी पोहोचणार गिरीत
महाराष्ट्र राज्याने सुमारे 2 ते 3 किमी अंतरावरील मणेरी तसेच इतर ठिकाणी किरकोळ दुऊस्ती, गेटिंग कंट्रोल सिस्टम यांची देखभाल केली आहे. गेट उघडल्यापासून सायंकाळपर्यंत पाण्याने सुमारे 8 किलोमीटरचा प्रवास केला असून दुपारपर्यंत दोडामार्ग येथे गोव्याच्या हद्दीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. हे पाणी आज 28 रोजी सायंकाळपर्यंत गिरी पंपिंग स्टेशनपर्यंत पोहोचेल व त्यानंतर साठवण टाकीला कच्चा पाणीपुरवठा होईल, अशी अपेक्षा वर्तविण्यात आली आहे.









