‘तरुण भारत’च्या वृत्ताची दखल : हायमास्ट दुरुस्तीसह नव्या दिव्यांचीही सोय
बेळगाव : सदाशिवनगर येथील लिंगायत समाजाच्या कलमठ स्मशानभूमीत सोमवारी सायंकाळी विद्युत दिवे बसविण्यात आले. रविवारी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात अपघातातील एका मृतावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली होती. यासंबंधी ‘तरुण भारत’ने ‘रस्त्यावर झगमगाट, स्मशानात अंधारवाट’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. ‘तरुण भारत’मधील वृत्ताने प्रशासनाला जाग आली असून सोमवारी सायंकाळी मनपाच्या कर्मचाऱ्यांनी स्मशानभूमीत जाऊन नादुरुस्त विद्युत दिवे दुरुस्त केले. काही ठिकाणी नव्याने दिवे बसविण्यात आले. हायमास्टही सुरू करण्यात आले आहेत. मनपाच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीची कामे राबविली.
मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात अंत्यसंस्कार
दि. 21 फेब्रुवारी रोजी दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या संदीप मल्लिकार्जुन उदोशी (वय 43) रा. महांतेशनगर यांचे रविवारी 3 मार्च रोजी खासगी इस्पितळात निधन झाले होते. स्मशानभूमीत अंधार असल्यामुळे मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबीय व आप्तेष्टांवर आली होती. या प्रकारामुळे अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत जमलेल्या नागरिकांनी सरकारी कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती. भ्रष्टाचार निर्मूलन परिवाराचे सुजित मुळगुंद यांनी प्रकाशाची व्यवस्था झाली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी त्वरित दखल घेत स्मशानभूमीत अंधार दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केली.
अंधार त्वरित दूर केल्याने समाधान
हायमास्ट सुरू करण्याबरोबरच आठ विद्युत दिवे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे सोमवारी रात्री कलमठ स्मशानभूमीतील अंधार दूर होऊन प्रकाश पडला होता. प्रशासनाच्या डोळ्यात ‘तरुण भारत’ने अंजन घातल्याने त्वरित विद्युत दिव्यांची सोय करण्यात आली आहे.









