अर्थ-कर स्थायी समिती बैठकीत निर्णय : सर्वसाधारण बैठकीत होणार शिक्कामोर्तब
बेळगाव : बहुचर्चित कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हस्तांतराला अखेर महापालिकेच्या अर्थ व कर स्थायी समिती बैठकीत हिरवाकंदील दर्शविण्यात आला. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील वसती प्रदेश, बाजार एरिया, बंगलो एरिया, खुली जागा, मैदाने महापालिकेकडे वर्ग करून घेतली जाणार असून सदर ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत चर्चेला घेऊन त्याला अंतिम मंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हस्तांतराच्या विषयाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. बुधवारी महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील स्थायी समिती सभागृहात अर्थ व कर स्थायी समितीची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नेत्रावती विनोद भागवत होत्या. त्याचबरोबर व्यासपीठावर महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, सत्ताधारी गटनेते गिरीश धोंगडी, विरोधी गटनेते मुजम्मिल डोनी, सदस्य अॅड. हनुमंत कोंगाली, शिवाजी मंडोळकर, प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार, महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी, महसूल अधिकारी संतोष आनिशेट्टर यांच्यासह सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
सुरुवातीला कौन्सिल सेक्रेटरींनी मागील बैठकीचे इतिवृत्त वाचून दाखविले. तसेच बुधवारच्या बैठकीची विषय पत्रिका वाचून दाखविली. विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर शेवटी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हस्तांतरणाचा विषय चर्चेला घेण्यात आला. महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांनी हस्तांतराबाबतची सर्व प्रक्रिया बैठकीत उपस्थितांना पटवून दिली. यापूर्वी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील वसती प्रदेश महापालिकेत समाविष्ट करून घेण्याबाबत निर्णय झाला होता. 2023 मध्ये याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आला होता. कॅन्टोन्मेंटचे सीईओ यांनी हस्तांतराबाबतचा प्रस्ताव सदन कमांडला पाठविला होता. त्यानंतर बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बैठका घेऊन सदर अहवाल नगरविकास खात्याकडे पाठविला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन यावर निर्णय घेण्यात यावा असे सांगण्यात आले होते. त्यामुळे अनेकवेळा बैठका घेऊन यावर चर्चा करण्यात आली आहे. त्याचबरोबर हस्तांतराच्या प्रक्रियेबाबत आक्षेप देखील मागविण्यात आले होते. पण कोणीही आक्षेप नोंदविले नाहीत. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत येणाऱ्या वसतीभागासह बाजार एरिया, बंगलो एरिया, खुली जागा मैदाने देखील महापालिकेकडे वर्ग करून घेण्यात यावीत, असा प्रस्ताव असल्याचे सांगितल्यानंतर बैठकीत अध्यक्ष, महापौर, उपमहापौर व सदस्यांनी चर्चा करून कॅन्टोन्मेंटच्या हद्दीतील परिसराचे हस्तांतर करून घेण्यात होकार दर्शविला. अध्यक्षा नेत्रावती भागवत यांनी सदर हस्तांतराचा प्रस्ताव पारित केल्याचे बैठकीत सांगितले. याबाबत सर्वसाधारण बैठकीत चर्चा करून हस्तांतरावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
महापालिकेची प्रभाग संख्या वाढणार
बेळगाव महानगरपालिकेकडे सध्या 58 प्रभाग आहेत. त्यातच आता कॅन्टोन्मेंट बोर्डाचे देखील हस्तांतर करण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याने महापालिकेच्या प्रभाग संख्येत वाढ होणार आहे. कॅन्टोन्मेंटच्या हद्दीतील प्रभागांची संख्या 7 असून महापालिकेच्या 58 प्रभागांव्यतिरिक्त यापुढे अतिरिक्त 7 प्रभाग असणार आहेत. त्यामुळे भविष्यात महापालिकेचे 65 नगरसेवक असतील. गेल्या अनेक वर्षांपासून विविध विकासकामांपासून वंचित असलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील रहिवाशांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी महापालिकेला कसरत करावी लागणार आहे.









