दैनिक तरुण भारत संवाद वृत्ताची दखल
ओटवणे प्रतिनिधी
चराठा – कारिवडे मुख्य रस्त्यादरम्यान पुनमवाडी तिठा बस स्टॉप येथील भल्या मोठया खड्ड्याबाबत दैनिक तरुण भारत संवादने सार्वजनिक बांधकाम खात्याचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष केले. मात्र याची कारीवडे ग्रामपंचायतीने तात्काळ दखल घेत स्वतः हा खड्डा बुजवून हा रस्ता वाहतुकीस सुरळीत केला. त्यामुळे कारीवडे ग्रामपंचायतीचे वाहन चालकांसह विद्यार्थी, प्रवाशी व ग्रामस्थांनी आभार मानले आहे.
तिठ्यावरील बस स्टॉप जवळच्या या भल्यामोठ्या खड्ड्याचा फटका वाहनचालकांसह शालेय विद्यार्थी व प्रवाशांना बसत होता. तसेच तिठयावरच हा खड्डा असल्यामुळे या ठिकाणी किरकोळ अपघातही झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने याची तात्काळ दखल घेऊन हा खड्डा बुजवावा अशी मागणी विद्यार्थी व प्रवाशांच्यावतीने कारीवडे येथील सामाजिक युवा कार्यकर्ते रवी परब यांनी केली होती.
दरम्यान माजगाव नाला येथे गुगल मॅपवर हा रस्ता कोल्हापूरसह पुण्याकडे जाणारा असा दाखविण्यात आल्यामुळे बांदा येथून कोल्हापूरसह पुण्याकडे जाणारे पर्यटक व इतर प्रवासी माजगाव नाला येथुन चराठा मार्गे या मार्गावरूनच प्रवास करतात. पर्यायाने या मार्गावर वाहनांची नेहमी वर्दळ असते. एक तर अरुंद रस्ता असलेल्या या तिठयावर तीव्र वळण असल्यामुळे या खड्ड्यात दुचाकी व चार चाकी वाहने जाऊन लहान मोठे अपघात झालेले आहेत. तसेच याच ठिकाणी बसच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांच्या जिवितास धोका निर्माण झाला होता.
या धोकादायक भल्या मोठ्या खड्ड्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्याने दैनिक तरुण भारत संवादच्या वृत्ताची याची कारीवडे सरपंच सौ आरती माळकर यांनी याची तात्काळ दखल घेऊन हा धोकादायक भला मोठा खड्डा बुजविला. त्यामुळे वाहन चालकांसह विद्यार्थी, प्रवाशी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करून सरपंच सौ आरती माळकर यांचे आभार मानले आहे.









