‘तरुण भारत’मधील बातमीनंतर महापालिकेला आली जाग : रहिवाशांतून समाधान
बेळगाव : भाग्यनगर सातवा क्रॉस येथील भंगीबोळात साचलेला कचरा साफ करण्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. याबाबत गुरुवार दि. 3 रोजी ‘तरुण भारत’ने भाग्यनगर सातवा क्रॉस भंगीबोळात कचऱ्याचे साम्राज्य या मथळ्याखाली सचित्र वृत्त प्रसिद्ध केल्याने महापालिकेने याची दखल घेत भंगीबोळातील कचऱ्याची सफाई केली आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांतून समाधान व्यक्त केले जात आहे. भाग्यनगर सातवा क्रॉस येथील भंगीबोळात मोठ्या प्रमाणात कचरा साचला तरी त्याची उचल करण्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले होते. त्यामुळे कचऱ्यावर कुत्री, उंदीर, साप व इतर प्राण्यांचा वावर वाढला होता. त्याचबरोबर दुर्गंधीदेखील पसरली होती. कचऱ्याची उचल करण्यासंदर्भात अनेकवेळा महापालिकेकडे विनंती करूनदेखील कचऱ्याची उचल झाली नव्हती. शहर व उपनगरातदेखील अनेक भंगीबोळामध्ये कचरा पडून आहे. सदर कचऱ्याची पावसाळ्यापूर्वी उचल करण्यात यावी, अशी मागणी बेळगावकरांतून केली जात आहे. भाग्यनगर सातवा क्रॉस भंगीबोळातील कचऱ्याबाबत ‘तरुण भारत’ने आवाज उठवताच जागे झालेल्या महापालिकेने सफाई केली आहे.









