नागरिकांमधून समाधान : एकाच खांबावर बसविला ट्रान्स्फॉर्मर

प्रतिनिधी/बेळगाव
पांगुळ गल्ली रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. मात्र अश्वत्थामा मंदिरालगत असलेले ट्रान्स्फॉर्मरचे खांब हटविण्यात आले नव्हते. परिणामी याठिकाणी वाहनधारकांना अडथळा बनला होता. याठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याने हेस्कॉमतर्फे येथील जुने खांब हटवून एकाच खांबावर ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात आला. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
पांगुळ गल्लीचा रस्ता अरुंद असल्याने दररोज वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने वाहनधारकांना अडकून पडावे लागत होते. बाजारपेठेचा महत्त्वाचा भाग असल्याने रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेऊन येथील अतिक्रमणे हटवून रस्त्याचे रुंदीकरण केले होते. तसेच रस्त्यावरील विद्युत खांब विविध वाहिन्या भूमिगत घालण्यात आल्या आहेत. मात्र अश्वत्थामा मंदिराशेजारी असलेल्या ट्रान्स्फॉर्मर हटविण्यात आला नव्हता. ट्रान्स्फॉर्मरचे दोन्ही खांब वाहतुकीस अडथळा बनले होते. गल्लीतील रस्त्याचे रुंदीकरण झाले असल्याने व्यावसायिकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे लहान-मोठ्या वाहनांसह ग्राहकांच्या वाहनाची गर्दी वाढली आहे. परिणामी अश्वत्थामा मंदिराजवळील ट्रान्स्फॉर्मरचा खांब अडचणीचा बनला होता. याठिकाणी दररोज वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे सदर खांब हटविण्याची मागणी सातत्याने करण्यात आली होती.
मंदिराशेजारी होणारा अडथळा दूर
मागणीची दखल घेवून ट्रान्सफॉर्मर हटविण्यासाठी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. मंगळवारी सदर ट्रान्सफॉर्मर हटविण्याची कार्यवाही करण्यात आली. यावेळी ट्रान्सफॉर्मर अन्यत्र स्थलांतर करून एकाच खांबावर बसविण्यात आला. त्यामुळे मंदिराशेजारी होणारा अडथळा कमी झाला आहे. याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.









