स्थानिक तरूणांनीच बजावली कामगीरी
वास्को : वाडे वास्कोतील साळकर कॉलनीजवळील तळ्यात आढळलेल्या मगरीला पिंजऱ्यात बंदीस्त करण्यास अखेर यश आले. स्थानिक तरूणांनीच या मगरीला पकडण्यासाठी गेले काही दिवस कष्ट घेतले होते. ही मगर मगरीचे पिल्लू असून या शिवाय अन्य दोन मगरी या तळ्यात असल्याचे स्थानिक तरूणांनी म्हटले आहे. पकडलेल्या मगरीला वनखात्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून वाडेतील या तळ्यात भली मोठी मगर फिरताना दिसू लागल्याने स्थानिक लोकांमध्ये भिती पसरलेली होती. वेगवेगळ्या आकाराच्या मगरी अधूनमधून दिसू लागल्याने तळ्यात एकच नव्हे तर दोन तीन मगरी असण्याचा संशय व्यक्त केला जात होता. या मगरी दिवसा व रात्री तळ्यातून खुल्या जमीनीवर येऊन फिरू लागल्याने लोकांची चिंता वाढली होती. वन खात्याला यासंबंधी माहिती देण्यात आली होती. मात्र, वन खात्याकडून त्या मगरीला ताब्यात घेण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे स्थानिक समाजसेवक ग्रासिएस कुतिन्हो व वाड्यावरील अन्य युवकांनी त्या मगरीला जेरबंद करण्यासाठी गेले काही दिवस कष्ट घेतले. या तळ्याच्या कडेवर त्यांनी पिंजरा लावला होता. अखेर काल बुधवारी सकाळी एक मगर त्या सापळ्यात अडकली. युवकांनीच तिला बाहेर काढून तीचे तोंड बांधले. त्यानंतर वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना बोलावून तीला खात्याकडे सुपुर्द करण्यात आले. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार पकडण्यात आलेली मगर हे मगरीचे पिल्लू असून याहून मोठ्या मगरी या तळ्यात असल्याची भिती त्यांनी व्यक्त केली आहे. अन्य मगरींनाही सापळ्यात अडकवण्यासाठी स्थानिक तरूणांनी प्रयत्न चालवले आहेत.









