सेन्सेक्स 634 अकांनी मजबूत : निफ्टी 190 अंकांवर सावरत बंद
वृत्तसंस्था / मुंबई
भारतीय भांडवली बाजारातील अखेर मागील सहा दिवसांच्या घसरणीला आठवड्यातील शेवटच्या दिवशी शुक्रवारी पूर्णविराम मिळाला आहे. यामध्ये सेन्सेक्स 634 अंकांनी तर निफ्टी 190 अंकांनी मजबूत राहिले आहेत. शुक्रवारी बँकिंग, आयटी आणि धातूसह अन्य काही निवडक क्षेत्रांमध्ये तेजी राहिल्याचा लाभ भारतीय शेअर बाजाराला झाल्याचे दिसून आले. यावेळी कोल इंडियाचे समभाग हे सर्वाधिक मजबूत राहिले आहेत.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 634.65 अंकांनी वधारुन निर्देशांक 63,782.80 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 190.00 अंकांच्या मजबुतीसह निर्देशांक 19,047.25 वर बंद झाला आहे. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 28 समभाग तेजीत राहिले असून फक्त 2 समभाग हे प्रभावीत राहिले आहेत.
विविध कंपन्या आपले तिमाही कामगिरीचे अहवाल सादर करत आहेत. यामध्ये शुक्रवारी देशातील दिग्गज वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपला अहवाल सादर केला आहे. मारुतीचा जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत निव्वळ नफा हा वर्षाच्या आधारे तब्बल 80.3 टक्क्यांनी वधारुन 3716.5 कोटी रुपये राहिला आहे. या घटनेचा सकारात्मक प्रभाव हा भारतीय बाजारावर राहिला असून याचा लाभ शेअरबाजाराला झाल्याचे दिसून आले.
अमेरिकन बाजारात घरसरण
अमेरिकन बाजारात तिमाही अहवाल सादर करण्यात येत आहेत. याचा प्रभाव बाजारात होत असून टेक समभागांच्या विक्रीमुळे नॅस्डॅक 226 अंकांनी घसरुन बंद झाला. याचा परिणाम भारतीय बाजारावर झाला असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये एचसीएल टेक, कोल इंडिया, अदानी एंटरप्राईजेस यासारख्या कंपन्यांचे समभाग तीन टक्क्यांनी वधारले आहेत. तर डॉक्टर रे•ाrज लॅब, युपीएल, आयटीसी, आणि एशियन पेन्ट्स यांचे समभाग मात्र नुकसानीत राहिले आहेत.
मागील काही दिवसांपासून सुरु असलेले घसरणीचे बाजारातील सत्र सप्ताहातील अंतिम सत्रात शेवटी थांबले आहे. परंतु आता आगामी आठवड्यात बाजाराची काय स्थिती राहणार हे पहावे लागणार असून त्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांना आपली व्यूहरचना नव्याने करावी लागणार असल्याचे शेअरबाजार तज्ञांनी स्पष्ट केले आहे.








