आंदोलनाला यश : विद्यार्थी-ग्रामस्थांतून समाधान
हिंडलगा : मण्णूर गावासाठी अखेर स्वतंत्र बसची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. हिंदवी स्वराज्य युवा संघटना, देवस्की पंच कमिटी, ग्रा. पं. सदस्य तसेच गावातील शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी स्वतंत्र बससेवेसाठी आंदोलन छेडले होते. या आंदोलनाची दखल घेत परिवहन मंडळाने सोमवारपासून (दि. 29) ही बस सुरू केली असून, ग्रामस्थांच्यावतीने बसचे स्वागत करण्यात आले. अनेक वर्षांपासून स्वतंत्र बस नसल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांचे अतोनात हाल होत होते. त्यामुळे मण्णूर गावच्यावतीने हिंदवी स्वराज युवा संघटना, देवस्की पंच कमिटी, ग्रा. पं. सदस्य, दलित संघर्ष समिती व ग्रामस्थांतर्फे रास्ता रोको आंदोलन करत 22 जुलै रोजी परिवहन मंडळाला निवेदन दिले होते. गोजगा व आंबेवाडी गावातून येणाऱ्या बसेस प्रवाशांनी खचाखच भरून येतात. त्यामुळे सर्व बसेस मण्णूर येथे न थांबता थेट बेळगावला जात होत्या. परिणामी मण्णूर येथील विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे हाल होत होते. अखेर याची दखल घेत सोमवारी मण्णूर गावाला सकाळी 8 वा. व सायंकाळी 5 वा. च्या फेरीसाठी स्वतंत्र बस सोडण्यात आली. यावेळी मुकुंद तरळे, नारायण शहापूरकर, मधुकर चौगुले यांच्यासह कार्यकर्ते, विद्यार्थी व ग्रामस्थांतर्फे बसचे स्वागत करून चालक आणि वाहकाला सन्मानित करण्यात आले.









