जिल्हा पोलीसप्रमुखांसमोर हजर करून पाठविले गावाला
बेळगाव : खानापूर तालुक्यातील कोडचवाड येथील युवक संपतकुमार बडीगेर याला सुखरूपपणे त्याच्या आई-वडिलांकडे सुपूर्द करण्यात आले. नंदगड पोलिसांनी तेलंगणा येथील अमिदाबाद जिल्ह्यातील एका गावातून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर नंदगड पोलीस मंगळवारी बेळगावात दाखल झाले. जिल्हा पोलीसप्रमुख भीमाशंकर गुळेद यांच्यासमोर संपतकुमारला हजर करण्यात आले. यावेळी संपतकुमारने मी परीक्षेला बसलो नाही. त्यामुळे मला घरातील ओरडतील म्हणून तेलंगणाला गेल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला नंदगड येथे नेण्यात आले. त्यांच्या आई-वडिलांना नंदगड पोलीस स्थानकात बोलावून संपतकुमारला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.
24 सप्टेंबरपासून संपतकुमार बेपत्ता झाला होता. दरम्यान, त्याची दुचाकी, बॅग तसेच मोबाईल यडोगा बंधाऱ्यातील नदीपात्रात सापडला होता. त्यामुळे पोलिसांनी नदीपात्रातच चार दिवस शोधमोहीम राबविली होती. मात्र पोलिसांना काहीच सापडले नाही. मोबाईल कॉल डाटावरून तपास सुरू केल्यानंतर तो तेलंगणा परिसरात असल्याचे समजले. नंदगड पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक सत्तेगेरी आणि हवालदार शिवकुमार दुरदुंडीमठ हे तातडीने तेलंगणा येथे गेले. तेथील एका खेड्यातून ताब्यात घेतले. पोलिसांच्या कार्याबद्दल कौतुक होत आहे.









