तळेरे : प्रतिनिधी
बीएलओ ड्युटीवर हजर न झालेल्या मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कारवाईच्या नोटीसा आल्याने आमदार कपिल पाटील, शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे आणि मुंबई अध्यक्षा कल्पना शेंडे यांनी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेतली. सदर बैठकीत मुंबईतील शिक्षण उपसंचालक, शिक्षण निरीक्षक, उत्तर/दक्षिण/पश्चिम मुंबई महानगरपालिकेचे दोन्ही शिक्षणाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी भोसले यांनी या बैठकीत कोणत्याही मुख्याध्यापक, शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर कारवाई केली जाणार नाही असे आश्वासन दिले.
जूनमध्ये शाळा सुरु झाल्यानंतर पहिल्याच आठवडयात मुंबईतील हजारो शिक्षकांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत बीएलओ ड्युटीवर हजर राहण्याचे आदेश आले होते. शाळेतील शिपाई, लिपीक, शिक्षक, मुख्याध्यापक यांना बीएलओ ड्युटी आल्यामुळे प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. सरसकट बीएलओ आल्याने दैनंदिन शालेय कामकाज कोलमडण्याची भिती निर्माण झाली. ड्युटीवर हजर न झाल्याने फौजदारी कारवाईच्या नोटीसा यायला लागल्या होत्या. त्यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आमदार कपिल पाटील आणि कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी भारत निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची भेट घेतली होती. आज जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमुळे हजारो शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
बैठकीतील निर्णय –
बीएलओ ड्युटीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने आता पर्यायी व्यवस्था केलेली आहे. माध्यमिक शिक्षकांना बीएलओ ड्युटीसाठी यापुढे आदेश येणार नाहीत. मुख्याध्यापक, शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांनी कारवाईच्या नोटीसांना घाबरु नये. कुणावरही सक्ती नाही. कुणावरही कारवाई नाही. तसे सुस्पष्ट आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली.