मुख्यमंत्री, नगरनियोजनमंत्री यांच्याकडून घोषणा : आराखडा रद्द करण्याची पेडणेवासियांची होती मागणी
पणजी : कितीही विरोध झाला तरी पेडणेचा विभागीय आराखडा रद्द करणार नाही, अशी भीमगर्जना करणारे नगरनियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी पुरता आठवडाही उलटला नाही तोच ’यु-टर्न’ घेत काल शुक्रवारी सदर प्लॅन रद्द केल्याची घोषणा केली. त्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही तो प्लॅन रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. तत्पूर्वी त्यांनी मंत्री राणे आणि आमदार आर्लेकर यांच्याशी चर्चा केली. मात्र एकाच विषयावर दोन मंत्र्यांकडून स्वतंत्ररित्या घोषणा झाल्यामुळे राजकीय वर्तुळात तो एक वेगळाच चर्चेचा विषय ठरला आहे. यासंदर्भात पुढील पाऊल उचलण्यापूर्वी आम्ही लोकांना विश्वासात घेणार आहोत, असे त्यांनी जारी केलेल्या व्हिडिओतून स्पष्ट केले आहे. सध्यस्थितीत पेडणे झोनिंग प्लॅनला कोणतेही मूल्य नाही. त्यामुळेच तो रद्द करण्यात आला आहे. आपले सरकार जनतेचे आहे, सदैव जनतेच्या हिताचाच विचार करेल. तसेच स्थानिकांना विश्वासात घेऊन विकासाची पुढील प्रक्रिया सुरू ठेवेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आराखडा रद्द करण्याची होती मागणी
पेडणेचा झोनिंग प्लॅन तयार करण्यासंदर्भातील अधिसूचना जारी झाल्यापासून राज्यभरात त्याचे गंभीर पडसाद उमटले होते. गेल्या कित्येक दिवसांपासून हा विषय राज्यात गाजत होता. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवताना, राणे यांचे हे कृत्य म्हणजे पेडणेतील जमिनी दिल्लीतील धनिकांच्या घशात घालणासाठी चालविलेले षडयंत्र असल्याचाही आरोप केला होता. पेडण्यातील स्थानिक लोकांनीही आंदोलने केली होती. तसेच सुमारे 150 जणांच्या गटाने नुकतीच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची सचिवालयात भेट घेऊन आराखडा पूर्णत: रद्द करण्याची मागणी केली होती.
राणे यांना दिले होते आव्हान
पेडणे तालुक्याच्या दोन आमदारांपैकी जीत आरोलकर हे विरोधात राहिले होते व आराखडा स्थगित ठेवण्यापेक्षा रद्दच करण्याची मागणी त्यांनी लावून धरली होती. दुसरे आमदार प्रविण आर्लेकर झोनिंग प्लॅनचे समर्थन करत होते. परंतु विरोधकांनी एका जमीन घोटाळ्यातील त्यांचा सहभाग जाहीर करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आव्हान मंत्री राणे यांना दिले होते.
पेडणेकरांना करायची होती मदत
आराखडा रद्द करण्याच्या निर्णयाची माहिती देताना राणे यांनी, काही लोक स्वार्थासाठी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. अनेक वर्षांपासून पेडणेतील लोक त्रस्त आहेत. त्यांची घरे, जमिनी सेटलमेंट झोनमध्ये दाखवलेली नाहीत. आम्हाला त्यांना मदत करायची होती, परंतु ते करता आले नाही. आता लोकांच्याच मागणीवरून हा आराखडा रद्द करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
आपले सरकार जनतेचे आहे, सदैव जनतेच्या हिताचाच विचार करेल. पेडण्यातील लोकांच्या हिताचा विचार करुनच ‘झोनिंग प्लॅन’ रद्द केला आहे.
डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
पेडणेकरांना मदत करायची होती, परंतु ती करता आली नाही. त्यांच्याच मागणीवरून हा आराखडा रद्द करण्यात येत आहे.
विश्वजित राणे, नगर नियोजनमंत्री
सरकारने घेतलेला निर्णय योग्यच : तानावडे
पेडणे विभागीय आराखडा रद्द करण्याच्या गोवा सरकारच्या निर्णयाचे प्रदेश भाजप अध्यक्ष, खासदार सदानंद शेट तनावडे यांनी जोरदार स्वागत केले आहे. त्यांनी सांगितले की हा निर्णय अतिशय योग्य आहे. भाजपचे गोव्यातील सरकार विकास करताना कोणावरही अन्याय होणार नाही याची, आजवर दखल घेत आले आहे. पेडणे विकास आराखडा रद्द करणे यामागे कोणतेही राजकारण नसून जनतेला नको असेल तर कोणतेही प्रकल्प लादले जाणार नाहीत. भाजपचे सरकार हे जनताभिमुख आहे. ते जनतेबरोबरच राहणार आहे, त्यामुळेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि नगर नियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी घेतलेला निर्णय गोव्याच्या भल्यासाठी आहे. आपण पूर्णत: समर्थन करतो, असे तानावडे पुढे म्हणाले.









