पाटण :
पाटण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला खिंडार पडले. माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपुत्र व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांनी हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबई येथील भाजपा पक्ष कार्यालयात हा कार्यक्रम भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. पाटणच्या ढेबेवाडी विभागातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिंदुराव चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह यावेळी भाजपात प्रवेश केला.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार अतुलबाबा भोसले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, केंद्रीय खनिज मंडळाचे संचालक भरत पाटील, आमदार मनोज घोरपडे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, पाटण विधानसभा मतदारसंघ प्रचार प्रमुख विक्रमबाबा पाटणकर, पाटण तालुका भाजपा अध्यक्ष नंदकुमार सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती. सत्यजितसिंह पाटणकर यांनी ज्या विश्वासाने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे, त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही रवींद्र चव्हाण यांनी यावेळी बोलताना दिली. प्रदेश भाजप कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास पाटणमधील पाटणकर गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
सामान्य जनतेसाठी सरकारच्या योजना राबविणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. सातारा जिह्यातील व पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या ज्या प्रश्नांसाठी पक्षात प्रवेश केलाय, ते सर्व प्रश्न सोडवण्यात येतील. केंद्रीय नेतृत्व आणि राज्याचे नेतृत्व आपणासह आपल्या बरोबर येणाऱ्या सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल, असा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, सत्यजितसिंह पाटणकर हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह आज भाजप पक्षात प्रवेश करत असून याचा आपल्याला मनस्वी आनंद होत आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे पाटण तालुक्याबरोबर सातारा जिह्यातील भाजपा पक्षाची ताकद निश्चितच वाढणार आहे. माजी विक्रमसिंह पाटणकर यांच्यासारखे चांगले नेतृत्व सातारा जिह्याला लाभले. त्यांनी त्यांच्या मंत्री पदाच्या काळात सर्वांना सोबत घेऊन चांगले काम केले आहे. अतिशय शांत, संयमी, कोणताही गर्व नसणारे नेतृत्व जिह्याला लाभले आणि आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सत्यजितसिंह पाटणकर काम करत आहेत. सातारा जिल्हा बँकेतही आम्ही एकत्र काम करत आहोत. आज सत्यजितसिंह पाटणकर भाजपात आल्याने पक्षाला सातारा जिह्यात एक मोठी ताकद मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करून सत्यजितसिंह यांनी आपल्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. सातारा जिह्यातील आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत.
खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, वास्तविक गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेचे केंद्रीकरण झाल्याचे आपणाला पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाटचाल करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथे भाषणे अशी व्हायची की, येथे आम्ही दगड जरी दिला. त्याला शेंदूर जरी फासला तरी लोक त्याला निवडून देत होते. लोकांची मते घेतली पण त्यांच्या मतांचा आदर कधी केला नाही. बालेकिल्ला, बालेकिल्ला म्हणून अनेक वर्षांपासून येथील लोकांना विकासापासून वंचित ठेवले. मात्र न्याय देण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले आहे. मतदारसंघात काम करताना काहीच कमी पडू दिले जाणार नाही. हा प्रवेश मागेच होणे अपेक्षित होते, मात्र कार्यकर्त्यांचा होणारा छळ पाहून ते किती वाट पाहणार होते. आपण सर्वजण कुटुंब म्हणून काम करूयात, जिथे लागेल तिथे मी असणार आहे.
सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, भाजपा पक्ष प्रवेश हा माझा एकट्याचा निर्णय नसून पाटण मतदार संघातील तमाम कार्यकर्ते, मतदारांचा निर्णय आहे. गेली दहा वर्षे पाटण मतदार संघातील जनतेला मुस्कटदाबी, दबाव तंत्राच्या राजकारणाला बळी पडावे लागले आहे. मतदारसंघात होत असलेला सत्तेच्या अहंकाराचा अन्याय असाह्य झाला आहे. मतदार संघातील सार्वजनिक विकासकामांना खीळ बसली असून अशा सर्व बाबींचा विचार करुन सर्वसामान्य जनतेसमवेत भाजपमध्ये जाण्याचा जनतेसह कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय हा सर्वसामान्य जनतेचा उठाव आहे.
जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले म्हणाले, आज सत्यजितसिंह पाटणकर व हिंदुराव पाटील यांचा भाजप पक्ष सोहळा उत्साहात पार पडला असून आज माझ्या जीवनातील हा आनंदाचा क्षण आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचे कुंभारगाव जे गाव आहे, तेथील सरपंचांचा प्रवेश देखील आज होत आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे निश्चित वर्चस्व राहण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूयात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पाटण मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची ताकदीने बांधणी करूया.
यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदूराव पाटील, याज्ञसेन पाटणकर, माजी सभापती राजाभाऊ शेलार, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती राजेश पवार, विक्रमसिंह पाटणकर दूध संघाचे चेअरमन सुभाषराव पवार, पाटण अर्बन बँकेचे चेअरमन बाळासाहेब राजेमहाडिक, माजी उपसभापती रमेश मोरे, अॅड. अविनाश जानुगडे, श्रीराम नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष हिंदुराव सुतार, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, योगेश पाटणकर, अभिजित पाटील, पाटण नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे आजी माजी सदस्य मतदार संघातील विविध संस्थांचे पदाधिकारी यासंह हजारो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
- प्रशासकीय इमारतीस छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्या
पाटण येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या तहसिल तसेच विविध शासकीय कार्यालयांचा समावेश असलेल्या बहुउद्देशीय प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तालुक्याच्या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या या अद्ययावत प्रशासकीय इमारतीस छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिवजयंती उत्सव समिती, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू एकता आंदोलन, सुंदर स्वराज्य प्रतिष्ठान सुंदरगड संवर्धन समिती अशा विविध संस्था, संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे.
- ‘तरूण भारत’चा अंदाज तंतोतंत खरा
पाटण मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सत्यजितसिंह पाटणकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त ‘तरूण भारत’ने सर्वप्रथम दिले होते. त्यानंतर झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनीही भाजप प्रवेशाचा आग्रह धरला होता. वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर पाटणकर भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्तही ‘तरूण भारत’ने दिले होते. हाही अंदाज खरा ठरला.
- पाटण मतदार संघात भाजपची ताकद दाखवून देऊ- सत्यजितसिंह पाटणकर
भारतीय जनता पक्षाची ध्येयधोरणे मतदारसंघातील तळागाळापर्यंत पोहोचवून जिल्हा परिषद – पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवू, असा ठाम विश्वास सत्यजितसिंह पाटणकर यांनी व्यक्त केला.








