नगरसेवक रवी साळुंखे यांनी पुन्हा केला पाठपुरावा : काम सुरू झाल्याने समाधान
बेळगाव : शहापूर येथील नाथ पै सर्कल ते बसवेश्वर सर्कल खासबाग पर्यंतच्या रस्त्यावरील गटारी पूर्णपणे बुजल्या होत्या. याचबरोबर त्या गटारीवर काँक्रीट घातल्याने त्यामधील कचरा काढणे देखील अवघड जात होते. याबाबत महापालिका आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यावेळी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र नगरसेवक रवी साळुंखे यांनी पुन्हा पाठपुरावा केला आणि गंभीर समस्या सांगितली. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी या युजीडीचे काम सुरू केले आहे. स्मार्टसिटीच्या कामामध्ये बेधुंदपणा दिसू लागला आहे. काम करायचे त्यानंतर पुन्हा त्याची खोदाई करायची, असे प्रकार जागोजागी दिसत आहेत. काही ठिकाणी अधिक खोलीच्या गटारी काढल्या आहेत. त्यावर काँकीट घालण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना काम करणे देखील अवघड जात आहे. त्यामुळे कचरा साचून पाण्याचा निचरा देखील होत नव्हता. काही ठिकाणी गटारीच पूर्णपणे बुजल्या होत्या. पावसाळ्यात अनेकांच्या घरात पाणी शिरुन मोठे नुकसान होत आहे. या प्रकारामुळे शहापूर येथील नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी केल्या होत्या. नगरसेवक रवी साळुंखे यांनीही महापालिकेकडे पाठपुरावा केला. त्यामुळे आता या कामाला सुरूवात झाली आहे. यामुळे पावसाळ्यामध्ये आता या परिसरातील पाण्याचा निचरा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काम सुरू केल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.









