राज्यसभा अध्यक्ष धनकड जाखड यांना केला सादर : तृणमूललाही लवकरच देणार सोडचिठ्ठी
मडगाव : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचा त्याग करुन मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले आणि त्यानंतर पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर निवडून गेलेले ज्येष्ठ नेते लुईझिन फालेरो यांनी तृणमूल काँग्रेच्या नेत्यांकडून वारंवार होणाऱ्या क्लेशदायक मानहानीमुळे आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा अखेर राजीनामा दिला. राज्यसभेचे अध्यक्ष तथा उपराष्ट्रपती धनकड जाखड यांची भेट घेऊन त्यांनी आपला राजीनामा त्यांच्याकडे सादर केला. आता लवकरच ते तृणमूल काँग्रेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देणार आहेत. लुईझिन फालेरो हे राज्यसभेत गोव्यातील विविध प्रश्नावर सातत्याने आवाज उठवित होते. त्यामुळे तृणमूल काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर होता. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार असून देखील लुईझिन फालेरो समाधानी नव्हते. गेल्या वर्षभरापासून तर त्यांनी तृणमूल काँग्रेसपासून जवळपास फारकत घेतली होती. अखेर काल त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. आत्ता आपण नवीन सुरूवात करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने त्यांना फातोर्डा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची गळ घातली होती. परंतु, त्यांनी निवडणूक लढविण्यास स्पष्ट नकार दिला होता. तेव्हापासून तृणमूल काँग्रेस व लुईझिन फालेरो यांचे संबंध म्हणावे तेवढे चांगले नव्हते. तसेच विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला दारूण पराभव स्वीकारावा लागला होता. तसेच तृणमूल काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय पक्ष असल्याचा दर्जा गमावला होता.
ममतांनी कृपापूर्वक स्वीकारले
फालेरो यांनी राजीनामा दिल्यानंतर म्हटले आहे की, बंगालच्या मुख्यमंत्री आणि धर्मनिरपेक्षतेच्या दीपस्तंभापैकी एक, श्रीमती ममता बॅनर्जी यांनी आपणास अत्यंत कृपापूर्वक स्वीकारले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षात सामील होण्याचे आमंत्रण स्वीकारण्यासाठी त्यांनी आपणास प्रेरित केले आणि आपण तसे केले, कारण देशातील सर्व शक्तींना एकत्र आणण्यात काँग्रेसला यश आले नव्हते.
वास्तव सर्वांना माहीत आहे
जमिनीवरील वास्तव सर्वांना माहीत आहे. अधिक तपशीलवार न सांगता हे सांगणे पुरेसे आहे की, सर्वोत्कृष्ट हेतू असूनही, गोष्टी योजनेनुसार पूर्ण झाल्या नाहीत. त्याचबरोबर आपणास पक्षात राष्ट्रीय उपाध्यक्षासारखे महत्त्वाचे पद दिल्याबद्दल आपण ‘दीदींचे’ आभार मानतो. बंगालमधून आपणास राज्यसभेची जागा देऊ करण्याचा त्यांचा दयाळूपणा आणि मोठेपणाचे कौतुक करावे लागेल. त्यांचे आपल्यावरील विश्वासाबद्दल आपण त्यांचे आभार मानतो.
गोव्याचे प्रश्न राज्यसभेत मांडले
22 नोव्हेंबर 2021 रोजी मी राज्यसभा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर, मी नम्रपणे गोव्याची जमीन, तिथलं पर्यावरण आणि तिथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे मांडून गोव्याच्या लोकांची सेवा करण्याच्या या संधीचा सदुपयोग केला. म्हादई, वने, शेती, मत्स्यव्यवसाय, नाविकांचे कल्याण इत्यादी मुद्यावर महत्त्वाची माहिती आपण दिली. गोव्यातून 13 दशलक्ष टन कोळशाच्या वाहतुकीच्या करारानंतर सुंदर आणि शांत गोव्याचे दयनीय कोल हबमध्ये रूपांतरित होण्याच्या आपत्तीजनक परिणामांवर आपण बोललो. डॉ. फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांच्यासाठी त्यांच्या जन्मस्थानी गोव्यातील नावेली येथे केंद्रीय संग्रहालय बांधण्याची आपली इच्छा आहे. फ्रान्सिस्को लुईस गोम्स हे उदारमतवादी तत्वज्ञान असलेले बुद्धिजीवी राजपुत्र म्हणून ओळखले जात होते. ते महान वक्ते, चिकित्सक, लेखक, इतिहासकार, अर्थशास्त्रज्ञ, राजकीय शास्त्रज्ञ आणि पोर्तुगालमधील गोव्याचे खासदार होते. डॉ फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांनी भारतासाठी राष्ट्रीय स्वातंत्र्याची संकल्पना मांडली होती, असे फालरो यांनी म्हटले आहे.
पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता
राज्यसभेचा राजीनामा दिल्यानतंर अनेक राजकीय पक्षांनी आपल्याशी संपर्क साधला असला तरी आपण अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही. सद्या तरी आपण कोणत्याच पक्षात प्रवेश करणार नसल्याचे त्यांनी दै. तरुण भारतशी बोलताना स्पष्ट केले. राजकीय संन्यासही घेणार नाही, असेही ते म्हणाले. मात्र, उपलब्ध माहिती प्रमाणे, लुईझिन फालेरो हे पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता असून काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यास त्यांना दक्षिण गोव्यातून लोकसभा उमेदवारी मिळू शकते अशी माहिती काँग्रेसच्या गोटातून प्राप्त झाली आहे.









