सीमाभागातील प्रवाशांना दिलासा : बससेवा पूर्ववत
प्रतिनिधी /बेळगाव
मुख्यमंत्री बोम्माई यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे ठप्प झालेली महाराष्ट्राची लालपरी अखेर तिसऱया दिवशी बेळगावात दाखल झाली आहे. त्यामुळे सीमाभागातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानामुळे दोन्ही राज्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याचा बससेवेवरदेखील परिणाम झाला होता. दोन दिवसांपासून बंद असलेली बससेवा रविवारी सकाळपासून सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ातील कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला आणि चंदगड भागातूनदेखील लालपरी बेळगावात दाखल होत आहे.
एका वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्राची लालपरी बेळगावला आली नव्हती. केवळ सीमाहद्दीपर्यंत धावत होती. कोकणातील बस शिनोळी फाटय़ापर्यंत येत होत्या. तेथून पुढे प्रवाशांना खासगी वाहनाचा आधार घेत बेळगाव गाठावे लागत होते. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक फटका बसत होता. अखेर तणाव काही प्रमाणात निवळला असल्याने लालपरी पूर्ववतपणे बेळगावात धावताना दिसत आहे. बेळगाव जिल्हय़ाला गोवा आणि महाराष्ट्र राज्य लागून असल्याने गोवा आणि महाराष्ट्राच्या बसेस कर्नाटकाच्या विविध भागात धावत असतात. बंद, आंदोलन आणि राजकीय वादग्रस्त विधानांमुळे या तिन्ही राज्यांच्या बससेवेवर मोठा परिणाम झाला होता. दरम्यान, तिन्ही परिवहन मंडळांच्या उत्पन्नाला फटका बसला होता.









