राधानगरी,महेश तिरवडे
राधानगरी अभयारण्यातील 1985 च्या अधिसूचनेनंतर दानपत्र देऊन विस्थापित होणारे तालुक्यातील एजीवडे हे पहिले गाव. कुटुंबे विस्थापित झाली, घरे, झाडे याचा मोबदला दिला, काही कुटुंबाची दुसरी पिढीसुद्धा विस्थापित ठिकाणी स्थिरावली, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे उपजीविकेसाठी बाहेरगावी गेलेल्या कृष्णा जानबा कांबळे मात्र या लाभापासून वंचित राहिला, पुनर्वसन प्रक्रियेत नाव असताना सुद्धा विलंबाने का होईना त्याला आता न्याय मिळाला आणि खऱ्या अर्थाने आज एका गावाचे पुनर्वसन पूर्ण झाले, असे म्हणावे लागेल.
जागतिक वारसा स्थळामध्ये समाशिष्ट राधानगरी अभयारण्याच्या विस्ताराला 1985 पासून सुरवात झाली. 2001 मध्ये अभयारण्य विस्ताराचा सर्व्हे झाला, प्रत्यक्षात 2013 पासून प्रत्यक्ष पुनर्वसनास सुरवात झाली, यात एजीवडेचे पूर्णत: पुनर्वसन झाले, पुनर्वसनानंतर सर्व कुटूंबे घरेदारे सोडून स्थलांतर झाली, यावेळी तांत्रिक कारणाने कृष्णा जानबा कांबळे यांचे एकट्याचे पुनर्वसन रखडल्याने त्यांचे एकटेच कुटूंब जंगलात राहू लागले. 2019 मध्ये त्यांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडीच वर्षे रखडला त्यानंतर 2021 ते 2022 या कालावधीत पुनर्वसन बैठकीत त्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता निधी अभावी हे काम रखडले होते.
कृष्णा कांबळे यांची घरची परिस्थितीची, हलाखीची. रोजगारासाठी त्यांनी परिवारासह शहरात धाव घेतली, ते शहरात गेले, पण पुनर्वसन प्रक्रियेपासून गेली 10 वर्ष वंचित राहिले. त्यानंतर एजीवडेत आले. गावातील एकमेव घरात ते आजारी आई, पत्नी आणि मुलासह राहु लागले. गेल्याच आठवड्यात त्यांच्या रोहित नावाचा 12 वर्षाच्या मुलाचा एजीवडेत अचानक मृत्यु झाला. जर त्यांच्या परिवाराचे वेळेत पुनर्वसन झाले असते तर मुलगा गमावला नसता, अशी व्यथा, वेदना कांबळे कुटुंबीयांनी व्यक्त केली होती. या प्रकरणात कांबळे कुटुंबीयांची झालेली ससेहोलपट आणि शासनाकडून झालेली दिरंगाई यावर ‘तरुण भारत संवाद’मध्ये प्रकाश टाकल्यानंतर शासकीय यंत्रणा जागी झाली.
जनमताचा रेटा, लोकप्रतिनिधीनी दिलेले लक्ष यामुळे प्रशासन सतर्क झाले, त्यांनी या कुटुंबातील तीन घटक जानबा शिवा कांबळे (मयत) यांचे वारस अनुसया जानबा कांबळे, जयवंत जानबा कांबळे (मयत) यांचे वारस शोभा जयवंत कांबळे व कृष्णा जानबा कांबळे या तीन घटकांना प्रत्येकी 10 लाख रुपयांप्रमाणे 30 लाख रुपये पुनर्वसनाची रक्कम दिली. तरुण भारत संवादच्या बातमीची दखल घेऊन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार, धनंजय महाडिक, मधुरिमाराजे छत्रपती, आमदार प्रकाश आबिटकर, भाजप तालुकाध्यक्ष संभाजी आरडे, तहसीलदार मीना निंबाळकर, उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, वनक्षेत्रपाल सुहास पाटील, प्रादेशिकचे वनक्षेत्रपाल साईनाथ तायनाक, मंडल अधिकारी सुंदर जाधव, मनसे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, विजय महाडिक, विलास रणदिवे, डॉ, सुभाष जाधव, राभ भोसले यांनी यात लक्ष देऊन कामाची दखल घेतली, कार्यकर्ते, संघटना, संस्था, दानशूर व्यक्ती आदींनी या कुटूंबास मदत करून माणुसकीचे दर्शन घडवले.
Previous Articleडेगवे येथे श्री रामनवमी उत्साहात संपन्न
Next Article घर खरेदीदारांना दिलासा; रेडी रेकनरचे दर ‘जैसे थे’









