महाराष्ट्राच्या विविध मार्गावर बससेवा पूर्ववत : लालपरीही दाखल, प्रवाशांना दिलासा
बेळगाव : बस वाहक वादावादीच्या घटनेमुळे मागील पाच दिवसांपासून ठप्प झालेली आंतरराज्य बससेवा गुरुवारपासून पूर्ववतपणे सुरू झाली आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांतील प्रवाशांना दिलासा मिळाला. बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून महाराष्ट्राच्या विविध मार्गावर बसेस सुसाट धावल्या. तसेच महाराष्ट्रातील लालपरी देखील कर्नाटकात दाखल झाली आहे. बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून आंतरराज्य बससेवा पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने सुरू झाली. बस वाहक वादावादीच्या प्रकरणामुळे आंतरराज्य बससेवेवर परिणाम झाला होता. दरम्यान दोन्ही राज्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होऊन बससेवा ठप्प झाली होती. दोन्ही राज्यांच्या परिवहन मंडळांनी खबरदारी म्हणून निश्चित काळासाठी बससेवा रद्द केली होती. बुधवारी बेळगाव आणि कोल्हापूर दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची आंतरराज्य बससेवा सुरू करण्यासंदर्भात व्हिडिओ
कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली होती. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. शिवाय पोलीस बंदोबस्तात बसेस सुरू करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. यानुसार आंतरराज्य बससेवा सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी मध्यवर्ती बसस्थानकातून कोल्हापूरला 40 बसफेऱ्या तर सांगली, मिरज आणि सातारा मार्गावरही बसेस सोडण्यात आल्या आहेत व कोल्हापूर आगारातूनही कर्नाटकाच्या विविध भागात लालपरी दाखल झाली आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या परिवहनलाही आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळाला आहे. क्षुल्लक कारणावरुन दोन्ही राज्यांमध्ये बसेस अडवून काळे फासण्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे दोन्ही राज्यांची बससेवा ठप्प झाली होती. परिणामी दोन्ही राज्यांच्या परिवहनचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. मागील पाच दिवसांत बेळगाव विभागाला लाखो रुपयांचा फटका बसला आहे. बेळगाव जिल्हा महाराष्ट्र आणि गोवा राज्याला लागून असल्याने बेळगाव आगाराच्या एकूण उत्पन्नापैकी 40 टक्के उत्पन्न हे महाराष्ट्रात धावणाऱ्या बसेसमधून उपलब्ध होते. मात्र मागील पाच दिवसांत एकही बस महाराष्ट्रात धावली नाही. मात्र आता आंतरराज्य बससेवा सुरू झाल्याने बेळगाव आगारालाही उत्पन्न प्राप्त होऊ लागले आहे.
प्रवाशांचे हाल
मागील चार दिवसांत आंतरराज्य बस ठप्प झाल्याने दोन्ही राज्यांतील प्रवाशांचे मोठे हाल झाले. विशेषत: चंदगड, कोल्हापूर, कोवाड, गडहिंग्लज, नेसरी, आजरा, कोल्हापूर यासह कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. तर काहींना खासगी वाहने भाडोत्री घेऊन प्रवास करावा लागला. यामध्ये आर्थिक भुर्दंडही बसला. अखेर गुरुवारपासून आंतरराज्य बससेवा सुरळीत झाल्याने सर्वसामान्य प्रवाशांसह कामगार, किरकोळ व्यावसायिक, नोकरदारांना दिलासा मिळाला आहे.
बेळगाव बसस्थानकातून कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा यासह मुंबई मार्गावरही बससेवा पूर्ववत झाली आहे. त्यामुळे लांबपल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे. मागील चार दिवसांत प्रवाशांना लांबपल्ल्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सचा (बसेस) आधार घ्यावा लागला होता. त्यामध्ये प्रवाशांची आर्थिक लूट झाल्याची तक्रारही पहायवास मिळाली. मात्र आता रात्रीच्या प्रवासासाठी देखील बेळगाव बसस्थानकातून बससेवा पूर्वपतपणे सुरू झाली आहे. त्यामुळे रात्रीचा प्रवासही सुखकर झाला आहे.
पुन्हा बसस्थानक गजबजले
मागील चार दिवसांत ठप्प झालेली आंतरराज्य बससेवा सुरू झाल्याने बस स्थानकात प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे बसस्थानक हजारो प्रवाशांनी गजबजले आहे. यात्रा-जत्रा आणि लग्नसराईचा हंगाम असल्याने प्रवाशांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे परिवहनचा महसूलही पूर्वपदावर येणार आहे. परिवहनने पूर्ण तयार करुन महाराष्ट्राच्या विविध मार्गावर बसफेऱ्या सोडल्या आहेत. शिवाय प्रवाशांचा प्रतिसादही मिळू लागला आहे.









