बापट गल्ली येथे उभारणार जी+4 पार्किंग इमारत : 120 कार पार्किंगची क्षमता
बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून बापट गल्ली येथे असलेल्या पार्किंग जागेत बहुमजली इमारत पार्किंगची मागणी करण्यात आली होती. याबाबत आराखडाही तयार करण्यात आला. मात्र त्या कामाला सुरुवात करण्यात आली नव्हती. सोमवारी या ठिकाणी बहुमजली पार्किंग इमारत उभी करण्याचा मुहूर्त साधण्यात आला. आमदार राजू सेठ यांच्या हस्ते कुदळ मारून पूजन करण्यात आले. यावेळी स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापकीय संचालक सहिदा अफ्रीन बळ्ळारी आणि मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी उपस्थित होते.शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बापट गल्ली येथे कारपार्किंग केले जाते. मात्र याठिकाणी अत्यंत कमी वाहने पार्किंग केली जात होती. त्यामुळे पार्किंगची समस्या गंभीर बनली होती. परराज्यातून तसेच जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांना पार्किंगची जागा शोधावी लागत होती. खासगी जागेतील पार्किंगमध्ये वाहने पार्किंग करावी लागत होती. त्यामुळे भुर्दंड बसत होता. आता याठिकाणी जी+4 इमारत उभारण्यात येणार असून वाहने पार्किंगची सोय होणार असल्याचे बळ्ळारी यांनी सांगितले. या पार्किंग इमारतीमध्ये एकूण 120 वाहने उभी करता येणार आहेत. पब्लिक प्रायव्हेट पार्टर्नशिप तत्त्वावर बीव्हीजी कंपनीच्या माध्यमातून ही इमारत उभी केली जाणार असून त्याचे भूमीपूजन झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. याबाबत स्मार्ट सिटीच्या माध्यमातून टेंडर देण्यात आले आहे. एकूणच अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या या कामाला आता सुरुवात होणार आहे.









