नुकसानभरपाई संदर्भात शेतकरी आशावादी
खानापूर : बेळगाव-गोवा चौपदरी रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तयार केला असून मच्छे ते होनकलपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावरून गेल्या तीन महिन्यांपासून वाहतूक सुरू आहे. महामार्ग प्राधिकरणाने गणेबैल टोल प्लाजा निर्माण करून टोल आकारणीच्या हालचाली सुरू केल्या होत्या. स्त्यासाठी जमीन गेलेल्या शेतकऱ्यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून आंदोलन उभारले होते. याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी खानापूर येथे बैठक घेऊन अखेर तोडगा काढला आणि सोमवारपासून गणेबैल येथे सकाळी 9 वाजल्यापासून महामार्ग प्राधिकरणाने टोल आकारणीला सुरुवात केली आहे.
टोल आकारणीस सुरुवात करण्यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी खानापूर येथे विश्रामधामात बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाई संदर्भात पुढील आठ दिवसांत आपण दावे निकालात काढू, असे ठोस आश्वासन दिले आहे. या आश्वासनावर विश्वास ठेवून येथील शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. मात्र पुढील सोमवारपर्यंत सर्व दावे निकालात काढल्यानंतर महामार्ग प्राधिकरणाने शेतकऱ्यांना जे सहकार्य करायचे आहे, त्यासंदर्भात योग्य सहकार्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या 12 वर्षांचा प्राधिकरण अधिकाऱ्यांचा अनुभव पाहता शेतकऱ्यांकडून अद्यापही प्राधिकरणाकडून सहकार्य मिळेल आणि योग्य वेळेत नुकसानभरपाई मिळेल की नाही, अशा द्विधामनस्थितीत आहेत. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या निर्णयानंतर पुढील दोन महिन्यांत नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नसल्यास पुन्हा उग्र आंदोलन उभारण्याचा इशारा काही शेतकऱ्यांनी दिला आहे.
अॅवॉर्ड कॉपी तातडीने मिळणे गरजेचे
प्रभूनगर ते लेंढा, खानापूर तालुका हद्दीपर्यंत शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. तसेच प्राधिकरणाने हवी असलेली कागदपत्रेही देण्यास टाळाटाळ केली आहे. रविवारी झालेल्या बैठकीत प्राधिकरणाने अॅवॉर्ड प्रती त्या-त्या ग्राम पंचायतीत तातडीने देण्यात याव्यात, असा आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे या अॅवॉर्डच्या प्रती मिळाल्यानंतर शेतकरी आपल्या पुढील कार्यवाहीसाठी प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी या अॅवॉर्ड कॉपी तातडीने मिळणे गरजेचे आहे.
स्थानिकांना सूट देणार
याठिकाणी टोल आकारणीसंदर्भात पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानिकांना सूट देण्यासंदर्भात याठिकाणी नियोजन केले असून टोल प्लाजाच्या शेजारी स्थानिकांना सूट देण्यासाठी काऊंटर सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी स्थानिकांनी आधारकार्ड, गाडीचे आर. सी. बुक आणून आपला मासिक पास करून घ्यावा, तसेच स्थानिकांना जे सहकार्य करायचे आहे ते आम्ही निश्चित करू. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार भूमिपुत्रांना याठिकाणी कामावर घेण्यासाठी आम्ही तयार आहोत. याठिकाणी 20 कर्मचारी लागणार आहेत. त्यासाठी ज्यांना याठिकाणी काम करण्याची इच्छा आहे, त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन टोल प्लाजाचे व्यवस्थापक सरफराज हुसेन यांनी केले आहे.









