मनपाकडून दहा मशीन्स खरेदी : महापौरांच्या हस्ते पूजन
बेळगाव : शहरामध्ये कचऱ्याचे साम्राज्य तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे फॉगिंग मशीन उपलब्ध करावी, अशी मागणी नगरसेवक रवी साळुंखे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. त्याची दखल घेत महापालिकेने फॉगिंग मशीन उपलब्ध केल्या आहेत. त्यांचे पूजन महापौर शोभा सोमनाचे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. डेंग्यु, मलेरिया, चिकुनगुनिया यासह इतर आजारांनी डोकेवर काढले आहे. वास्तविक महापालिकेने यासाठी औषधांची फवारणी करणे गरजेचे होते. मात्र आजपर्यंत महापालिकेने दुर्लक्षच केले आहे. शहापूर परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे फवारणी करणे गरजेचे आहे. यासाठी नगरसेवक रवी साळुंखे यांनी फॉगिंग मशीनबाबत विचारणा केली असता महापालिकेकडे केवळ एकच फॉगिंग मशीन होती. तर एक फॉगिंग मशीन वाहनाला असल्याचे आढळून आले. यामुळे तातडीने फॉगिंग मशीन उपलब्ध कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली होती.
आता दहा फॉगिंग मशीन उपलब्ध केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात किती उपलब्ध केल्या आहेत, याचा आकडा अधिकारी स्पष्ट सांगण्यास तयार नाहीत. वास्तविक डेंग्यु, मलेरिया यासारख्या आजारांनी डोकेवर काढले आहे. हा आजार डासांमुळे होतो. त्यासाठी फॉगिंग करणे महत्त्वाचे आहे. मात्र महापालिकेने त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. डेंग्यु आणि मलेरिया रुग्ण वाढ होण्यामागे महापालिकाच जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. वास्तविक पावसाळा सुरू होण्यापूर्वीच शहरामध्ये फवारणी करणे गरजेचे आहे. मात्र यावर्षी फवारणीच केली नाही. शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला आहे. मात्र काही मोजक्याच किमतीला असलेल्या फॉगिंग मशीन्स उपलब्ध नाहीत. नगरसेवकांनी जाब विचारल्यानंतर फॉगिंग मशीन्स उपलब्ध करण्यात येत आहेत. यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. सोमवारी फॉगिंग मशीन्सचे उद्घाटन झाले आहे. आता कोणत्या भागामध्ये फवारणी होणार? हे पहावे लागणार आहे. वास्तविक शहरामध्ये किमान 25 तरी फॉगिंग मशीन्सची गरज असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. उद्घाटनप्रसंगी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, आरोग्याधिकारी डॉ. संजीव डुमगोळ यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.









