तरुण भारत वृत्ताची दखल, नागरिकांतून समाधान
बेळगाव : कचेरी रोडवरील जुन्या तहसीलदार कार्यालयासमोरील गटारीवरील काँक्रीट कोसळले होते. यामुळे येथून ये-जा करणाऱ्यांना याचा धोका निर्माण झाला होता. गटारीवरील काँक्रीट कोसळून अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. याची दखल घेवून काँक्रिटीकरण करण्यात आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. जुन्या तहसीलदार कार्यालयात विविध सरकारी कामांनिमित्त नागरिकांची कायम गर्दी असते. या कार्यालयातून भूमी विभाग, सात-बारा उतारे, नाडकचेरी केंद्र, तसेच आधारकार्ड अपडेट, अशी विविध कामे केली जातात. त्यामुळे शासकीय कामानिमित्त या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. असे असतानाही कार्यालयाच्या व्यवस्थेकडे मात्र साफ दुर्लक्ष केले आहे. कार्यालयाच्या प्रवेशद्वारात असणाऱ्या गटारीवरील काँक्रीट फुटून लोखंडी सळ्या वर आल्या होत्या. यामुळे केव्हाही धोका निर्माण होण्याची शक्यता होती. अशातूनच नागरिकांना ये-जा करावी लागत होती. धोक्याच्या ठिकाणावरुनच वाहनांची ये-जा होत होती. याबाबत ‘तरुण भारत’मधून कार्यालयाच्या प्रवेशद्वारातील काँक्रिटीकरणाबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेवून ते काँक्रिटीकरण केले आहे. यामुळे प्रवेशद्वारातून ये-जा करण्याचा मार्ग सुरळीत झाला आहे. भविष्यातील धोका टळला आहे. याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.









