रस्त्याच्या दुतर्फा असलेली झुडपे हटविणे-खड्डे भरणे कामाला गती : तीन महिन्यात डांबरीकरण काम पूर्ण करण्याचे आश्वासन
वार्ताहर /कणकुंबी
गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या चोर्ला रस्त्याच्या कामाला सोमवारी बेटणेपासून सुरुवात करण्यात आला आहे. बेटणे ते कणकुंबी दरम्यान जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याच्या दुतर्फा असलेली झुडपे साफ करून खड्डे भरण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासीवर्गात व वाहनधारकांमध्ये समाधान पसरले आहे. शनिवारी कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री व जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी कणकुंबी येथे रस्त्याचे भूमिपूजन करून कामाला चालना दिली होती. हुबळी येथील एम. बी. कल्लूर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने सोमवारपासून रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली आहे. बेळगाव, चोर्ला, पणजी या रस्त्यांपैकी रणकुंडये ते चोर्ला म्हणजे गोवा हद्दीपर्यंतच्या 43.5 कि. मी. रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. बेळगाव-चोर्ला-पणजी हा रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 748 ए. ए. बेळगाव विभागांतर्गत येत असून राष्ट्रीय महामार्ग विभाग कारवार यांच्यावतीने निविदा मागवण्यात आल्या होत्या. सदर रस्त्याचे कंत्राट हुबळी येथील मेसर्स एम. बी कल्लूर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी यांनी 35.33 कोटी रुपयांच्या टेंडरवर एम. बी. कल्लूर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने घेतलेले आहे. चोर्ला रस्त्या दुरुस्तीसंदर्भात कणकुंबी भागातून अनेकवेळा निवेदन देऊन व आंदोलन करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. अखेर बेळगाव ते चोर्ला, गोवा हद्द रस्त्यांपैकी 26.130 कि. मी. ते 69.480 कि.मी म्हणजे रणकुंडये ते चोर्ला असे 43.5 कि. मी. रस्त्याचे डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.
ब्रिजचे काम नोव्हेंबरमध्ये -प्रशांत कल्लूर (एम. बी. इन्फ्रास्ट्रक्चर)
हुबळीच्या एम. बी. कल्लूर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे मालक प्रशांत कल्लूर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कामाला सुरुवात केली आहे. यावेळी ‘तरुण भारत’शी बोलताना त्यांनी, येत्या तीन महिन्यात रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात चिखले क्रॉसपासून ते गोवा हद्दीपर्यंतच्या रस्त्यावरील पॅचवर्क तसेच ज्या ज्या ठिकाणी रस्ता खराब झाला आहे तो पूर्वस्थितीत करून त्यानंतर रणकुंडये ते गोवा हद्दीपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल. पावसाळ्यापूर्वी हा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे मोकळा करून देण्यात येणार आहे. तसेच ऑक्टोबर, नोव्हेंबरदरम्यान कुसमळीजवळील मलप्रभा नदीवरील ब्रिजचे काम हाती घेणार असल्याची माहिती दिली.
…अन्यथा वनखात्याच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा
कुसमळीपासून ते गोवा हद्दीपर्यंत काही ठिकाणी वनखात्याच्या अखत्यारीतून हा रस्ता जातो. दरवर्षी रस्त्याच्या दुतर्फा असलेली झुडपे मारून किंवा साफसफाई करून रस्त्यावरील वाहतुकीला कोणताही अडथळा होणार नाही याची दक्षता वनखात्याकडून घेतली जात होती. परंतु यावर्षी मात्र वनखात्याने साधी झुडपे किंवा गवत देखील साफसफाई करण्याचे कामही हाती घेतलेले नाही. त्यामुळे झोपेचे सोंग घेणाऱ्या वनखात्याने आपली जबाबदारी वेळीच पार पाडली तर रस्त्याच्या कामाला कुठल्याही पद्धतीने अडथळा होणार नाही. वनखात्याने रस्त्याच्या गटारीपासून ते रस्त्यापर्यंत आत आलेली झुडपे किंवा झाडाच्या फांद्या मारून कामाला चालना द्यावी, अन्यथा वनखात्याच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून वनखात्याच्या कारभाराबद्दल निषेध नोंदवला जाईल, असा इशारा कणकुंबी-जांबोटी भागातील नागरिकांनी दिला आहे.









