बेळगावकरांची 166 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात : एंडोक्रिनॉलॉजिस्ट तज्ञही सेवेत
अमृत वेताळ/बेळगाव
गेल्या तब्बल 166 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या हृदयरोग तज्ञ आणि न्युरोसर्जन डॉक्टरांची अखेर सिव्हिल हॉस्पिटल आवारातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. या तज्ञ डॉक्टरांकडून आठवड्यातून दोन दिवस ओपीडीच्या माध्यमातून रुग्णांना सेवा दिली जात आहे. त्याचबरोबर एंडोक्रिनॉलॉजिस्ट या आणखी एका तज्ञ डॉक्टरांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. मेंदू, हृदय आणि हार्मोन्समधील असंतुलन या आजारावर उपचार घेण्यासाठी रुग्णांना खासगी इस्पितळांवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, आता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या सेवा दिल्या जात आहेत. सध्या केवळ ओपीडी सुरू असली तरी लवकरच रुग्णांवर शस्त्रक्रियाही केली जाणार आहे. डॉ. बसवराज बिरादार-पाटील (न्युरोसर्जन), डॉ. लोकनाथ बी. मदगण्णावर (हृदयरोग तज्ञ), डॉ. ए. नागनगौडा (एंडोक्रिनॉलॉजिस्ट) अशी त्यांची नावे आहेत.
1859 मध्ये सिव्हिल हॉस्पिटलची सुरुवात
सन् 1859 मध्ये सिव्हिल हॉस्पिटलची बेळगावात सुरुवात करण्यात आली. डॉ. बी. आर. आंबेडकर रोड येथील ब्रिटिशकालीन इमारतीत सुरू झालेल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 25 बेडची क्षमता होती. दररोज 125 हून अधिक रुग्णांवर ओपीडीतून उपचार केले जात होते. काही वर्षांपूर्वी सिव्हिल हॉस्पिटल बिम्स या वैद्यकीय विज्ञान संस्थेकडे हस्तांतरित करण्यात आल्यानंतर टप्प्याटप्प्याने अनेक बदल होत गेले. बिम्स महाविद्यालयाकडून एमबीबीएस व नर्सिंगचे शिक्षणदेखील दिले जात आहे. यापूर्वी अत्यंत कमी मनुष्यबळावर सिव्हिल हॉस्पिटलचा कारभार चालत होता. पण बिम्सकडे सोपविण्यात आल्यानंतर डॉक्टर, परिचारिकांची संख्या वाढली आहे. सध्या जुन्या सिव्हिल हॉस्पिटलची एक हजारहून अधिक बेडची क्षमता आहे. त्या ठिकाणी जनरल मेडिसीन, शस्त्रक्रिया, बालरोग, प्रसूती, स्त्रीरोग, कान, घसा व नाक (ईएनटी), त्वचारोग, नेत्ररोग, मानसोपचार, दंतचिकित्सा, ऑर्थोपेडिक विभागांतून रुग्णांना सेवा पुरविली जाते. या व्यतिरिक्त फार्मसी, प्रयोगशाळा, एक्स-रे, सिटी स्कॅन, डायलेसिस, आयसीयू, एमआयसीयू, एमआरआय, 24 तास रक्तपेढ्या कार्यरत आहेत.
सिव्हिलमध्ये विविध विभाग कार्यरत
सिव्हिलमध्ये आपत्कालीन विभागात ऑपरेशन थिएटर, कार्डियाक मॉनिटर्स आणि व्हेंटिलेटर्स यासारख्या आवश्यक असणाऱ्या उपकरणांची व्यवस्था आहे. तसेच सुसज्ज फिजिओथेरपी युनिट, ऑर्थोटिक्स आणि प्रोस्थेटिक्स विभाग आहेत. एक स्पिच थेरपी आणि मेडिकल गॅस सेक्शनसाठी सुविधा आहे. जिल्ह्यातील गोर गरीब जनतेचे रुग्णालय म्हणून सिव्हिल हॉस्पिटलकडे पाहिले जाते. या ठिकाणी बीपीएल रेशनकार्डधारक रुग्णांवर मोफत तर एपीएल रेशनकार्डधारक रुग्णांवर 50 टक्के बिल आकारून उपचार केले जातात. यापूर्वी एमआयआर, सिटीस्कॅनसाठी रुग्णांना बाहेर मोठी रक्कम मोजावी लागत होती. मात्र, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याने माफक दरात रुग्णांना त्याचा लाभ मिळत आहे.
कोट्यावधी रुपयांतून साकारले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
गेल्या काही वर्षांपूर्वी राज्य सरकारने कोट्यावधी रुपयांच्या निधीतून सिव्हिल हॉस्पिटल आवारात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारले आहे. त्या ठिकाणी विविध विभाग असून 31 तज्ञ डॉक्टरांच्या जागा मंजूर केल्या आहेत. त्यापैकी काही जागा अद्याप रिक्त असल्या तरी गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा लागून राहिलेल्या न्युरोसर्जन आणि हृदयरोग तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्युरोसर्जन म्हणून डॉ. बसवराज बिरादार-पाटील तर हृदयरोग तज्ञ म्हणून डॉ. लोकनाथ बी. मदगण्णावर, डॉ. ए. नागनगौडा (एंडोक्रिनॉलॉजिस्ट) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या रुग्णांची ईसीजी, इको टीएमटी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, स्टडिंग आदी प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. जुन्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी दररोज 1000 ते 1200 बाह्या रुग्ण येतात. अॅडमिट होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. रुग्णांना सिव्हिल हॉस्पिटलकडून दूध, केळी, ब्रेड, चहा, जेवण आदी प्रकारच्या सेवा पुरविल्या जातात. त्याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटलमध्येच औषध विभागही आहे. रुग्णांना लागणारी औषधे त्या ठिकाणी मोफत उपलब्ध करून दिली जातात.
सिव्हिलचा चेहरा मोहरा बदलला
सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे यापूर्वी रुग्ण व त्यांचे नातेवाईक नको रे बाबा, असे म्हणत होते. मात्र, बिम्स या वैद्यकीय विज्ञान संस्थेकडे सिव्हिलचा कारभार सोपविल्यापासून वैद्यकीय सेवा, स्वच्छता यामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. सरकारी नव्हे तर एखाद्या खासगी रुग्णालयात गेल्याचा भास होत आहे. त्यातच कोट्यावधी रुपये खर्चुन उभारण्यात आलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अनेक विभाग कार्यरत आहेत. अधिकृतपणे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे लोकार्पण झालेले नसले तरीदेखील आरोग्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार रुग्णांना सेवा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
तीन तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती
सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तज्ञ, न्युरोसर्जन आणि एंडोक्रिनॉलॉजिस्ट या केवळ तीन तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मदतनीस आणखी डॉक्टर व साहाय्यकांची नियुक्ती होणे बाकी आहे. त्यामुळे त्यांच्यावर ताण येऊ नये, यासाठी सध्या प्रायोगिक तत्त्वावर काही दिवसांपासून आठवड्यातील दोन दिवस ओपीडी सेवा दिली जात आहे. ऑपरेशन थिएटरचे काम अंतिम टप्प्यात असून सर्व सामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच ओपन हार्ट सर्जरी व मेंदूसंबंधी शस्त्रक्रियाही केली जाणार आहे.
लवकरच शस्त्रक्रियाही केली जाणार
गेल्या अनेक वर्षांपासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हे डॉक्टर उपलब्ध नव्हते. त्यामुळे संबंधित आजारांवर उपचार घेण्यासाठी गेलेल्या रुग्णांना रेफरन्स लेटर दिले जात होते. आयुष्मान भारत, आरोग्य कर्नाटक या योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत शस्त्रक्रिया मोफत केली जाते. मात्र, यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे शिफारसपत्र खासगी इस्पितळांना द्यावे लागत होते. काही वेळा यासाठी बराच वेळ लागत होता. कारण ऑनलाईनच्या माध्यमातून बेंगळूरला पाठविण्यात आल्यानंतर तेथून त्याला मंजुरी मिळते. त्यानंतर सिव्हिलमधील स्थानिक डॉक्टरांनी सही केलेले पत्र खासगी इस्पितळांना दिले जात होते. पण आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये न्युरोसर्जन आणि हृदयरोग तज्ञ डॉक्टर दाखल झाल्याने भविष्यात सिव्हिल हॉस्पिटलमध्येच संबंधित रुग्णांवर शस्त्रक्रियाही केली जाणार आहे. त्याचबरोबर हार्मोन्स असंतुलन संबंधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी इंडोक्रिनॉलॉजिस्ट या तज्ञ डॉक्टरांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
तज्ञ डॉक्टरांच्या नियुक्तीवर भर
सिव्हिल हॉस्पिटल आवारात उभारण्यात आलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टरांच्या एकूण 31 जागा सरकारने मंजूर केल्या आहेत. त्यापैकी काही जागा अद्याप रिक्त असल्या तरी प्रामुख्याने हृदयरोग तज्ञ, न्युरोसर्जन आणि इंडोक्रिनॉलॉजिस्ट या तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. या डॉक्टरांकडून आठवड्यातून दोन वेळा ओपीडी सेवा दिली जात आहे. ऑपरेशन थिएटरचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच संबंधित रुग्णांवर शस्त्रक्रियाही केली जाणार आहे.
डॉ. इराण्णा पल्लेद, वैद्यकीय अधीक्षक, बिम्स










