‘तरुण भारत’चा अंदाज ठरला खरा : प्रवाशांतून नाराजीचा सूर
बेळगाव : बेळगावहून हैद्राबादला जाण्यासाठी महत्त्वाची असलेली बेळगाव-मनुगुरू एक्स्प्रेस रेल्वे विभागाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 18 डिसेंबरपासून सेवा रद्द केली जाणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले. बेळगाव-मनुगुरू एक्स्प्रेस बंद पाडण्याचे रेल्वे खात्याचे प्रयत्न असल्याचे वृत्त यापूर्वीच ‘तरुण भारत’ने प्रसिद्ध केले होते. त्यामुळे ‘तरुण भारत’चे हे वृत्त अखेर खरे ठरले आहे. बेळगाव-सिकंदराबाद एक्स्प्रेस काही दिवसांनी बेळगाव-मनुगुरू अशी करण्यात आली. नागरिकांचा प्रतिसाद उत्तम असतानाही मागील अनेक दिवसांपासून एक्स्प्रेस उशिराने धावत होती. याबाबत काही रेल्वेप्रेमींनी समाजमाध्यमांवर नाराजीही व्यक्त केली होती.
‘तरुण भारत’ने 25 नोव्हेंबर रोजी या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध करून एक्स्प्रेस कशा पद्धतीने उशिरा येत आहे, याची माहिती दिली होती. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसातच नैर्त्रुत्य रेल्वेने बेळगाव-मनुगुरू रेल्वेसेवा रद्द करत असल्याचे कळविले आहे. 18 डिसेंबरपासून एक्स्प्रेस काही तांत्रिक कारणांनी रद्द केली जात आहे. पुढील सूचना येईपर्यंत एक्स्प्रेस रद्द ठेवण्यात येईल, अशी माहिती नैर्त्रुत्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मंजुनाथ कनमाडी यांनी दिली आहे. यामुळे आता बेळगावहून हैद्राबाद-सिकंदराबाद येथे ये-जा करण्यासाठी एकही एक्स्प्रेस उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांना बस तसेच खासगी वाहतुकीवर अवलंबून रहावे लागणार आहे.









